हिमाचल प्रदेशात ढगफुटीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. किन्नौर जिल्ह्यातील सांगला खोऱ्यात आता ढगफुटी झाली आहे. या घटनेत सुमारे 20 ते 25 वाहने पुरात वाहून गेली असून मोठं नुकसान झालं आहे. सांगलापासून 5 किमी अंतरावर असलेल्या कामरू गावात अचानक पूर आला आहे. कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे. दुसरीकडे, शिमला जिल्ह्यातील चिरगावमध्ये भूस्खलनामुळे ढिगाऱ्याखाली एक मजूर महिला अडकली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी सकाळी 6.30 वाजता घडली. छितकुलच्या आधी सांगलाच्या कामरू गावात मुसळधार पाऊस आणि पूर आला होता. पाणी आणि कचरा रस्त्यावर आला. या दुर्घटनेत अनेक वाहने वाहून गेली, तर काहींना ढिगाऱ्याचाही फटका बसला. अचानक आलेल्या पुरामुळे सफरचंद बागांचेही नुकसान झाले आहे. यासोबतच इतर पिकांचीही नासधूस झाली आहे.नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी महसूल आणि विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.
कानूनगो अमरजीत यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला असून सुमारे 20 ते 25 वाहनांचे नुकसान झाल्याचे सांगितले. शिमल्यातील चिरगाव येथील बागेत काम करणारी महिला मजूर ढिगाऱ्याखाली गाडली गेली. तिला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या तीन दिवसांत हिमाचलच्या तीन जिल्ह्यांमध्ये ढगफुटीच्या घटना समोर आल्या आहेत. चंब्याच्या सलोनी येथे बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहने वाहून गेली. तसेच मंगळवारी कुल्लूच्या रायसनमध्ये कैसमध्ये आलेल्या पुरामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला, तर काही वाहने नाल्यात वाहून गेली. या घटनेत अन्य तीन जण जखमी झाले आहेत.
हिमाचल प्रदेशात सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. 8 ते 11 जुलै या काळात झालेल्या विध्वंसामुळे राज्यातील जनजीवन अद्यापही रुळावर आलेले नाही. हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे शिमला-रामपूर राष्ट्रीय महामार्गासह 735 रस्ते गुरुवारी सकाळपर्यंत बंद आहेत. याशिवाय 224 पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि 990 वीज ट्रान्सफॉर्मर ठप्प झाले आहेत. चंबा, कांगडा आणि मंडी, शिमला जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस झाला. 20 ते 23 जुलै दरम्यान राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 25 जुलैपर्यंत राज्यात हवामान खराब राहण्याची शक्यता आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.