अभिनेत्री कंगना राणौत ह्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हिमाचल प्रदेशाचील मंडी येथून त्या भाजपच्या तिकीटावर नशीब आजमावत आहेत. सोमवारी हिमाचल प्रदेशातील काजा दौऱ्यावर असलेल्या कंगना यांना काँग्रेस कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून त्यांना विरोध दर्शवला. हिमाचल प्रदेशात सातव्या टप्प्यात मतदान होणार आहे.
काजा येथे कंगना यांना काळे झेंडे दाखवल्यानंतर त्यांनी विरोधकांवर सडकून टीका करताना काँग्रेसने पराभव मान्य केला असल्याचे म्हटले. कंगना म्हणाल्या की, आमच्या ताफ्यातील वाहनांवर हल्ला करण्यात आला. काँग्रेसने एका हिंसक आंदोलनाचे आयोजन केले होते. मंडीची जागा त्यांनी गमावली आहे हे त्यांच्या लक्षात आले असल्याने ते असे करत आहेत. या हल्ल्यात आमचे दोन कार्यकर्ते जखमी झाले आहेत. पण, काँग्रेसवाले ही पातळी गाठत आहेत हे खूपच दुःखद आहे.
खरे तर कंगना ह्या अनेकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या कंगना यांनी पद्मश्रीसारख्या नामांकित पुरस्काला गवसणी घातली आहे. पण, आता राजकारणात पाऊल ठेवताच त्यांनी 'बेस्ट एमपी'चा पुरस्कार जिंकण्याचे स्वप्न बाळगले आहे. कंगना यांच्या वर्कफ्रंटबद्दल भाष्य करायचे झाले तर, त्या त्यांच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटात झळकणार आहे. खरे तर हा चित्रपट आधी १४ जून २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता, पण निवडणुकीमुळे कंगना यांनी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ह्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून त्या भाजपच्या उमेदवार आहेत. त्या इतर राज्यांमध्ये देखील भाजपचा प्रचार करत आहेत. २०२२ च्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा थोडक्यात पराभव झाला होता. अशा स्थितीत राज्याचेही नुकसान झाले. आता ही चूक जनतेने पुन्हा करू नये. मोदींच्या गॅरंटीवर आज संपूर्ण जगाचा विश्वास आहे. आपल्याला पंतप्रधान मोदींसोबत डावीकडे किंवा उजवीकडे नाही तर सरळ चालायचे आहे, असेही कंगना यांनी सांगितले.