लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सर्वच जण 4 जूनची वाट पाहत आहेत. सर्व एक्झिट पोलच्या निकालांमध्ये एनडीएला आघाडी मिळत असल्याचं दिसत आहे. मात्र काँग्रेस एक्झिट पोलचे हे निकाल स्वीकारायला तयार नाही. हिमाचल काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिभा सिंह यांनी दावा केला आहे की, 4 जून रोजी येणारे निकाल एक्झिट पोलच्या विरुद्ध असतील.
देशात 400 चा आकडा पार करण्याचा नारा देणाऱ्या भाजपाला 200 चा आकडाही पार करता येणार नाही. ईव्हीएममध्ये छेडछाड झाली नाही तर हिमाचलमधील चारही जागा काँग्रेसला मिळतील, असा दावा केला आहे. तसेच राज्यातील जनतेने काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे असं प्रतिभा सिंह यांनी म्हटलं आहे.
4 जूनला निवडणूक निकाल काँग्रेसच्या बाजूने लागेल. निवडणूक निकालांवर प्रभाव टाकण्यासाठी भाजपा डावपेच आखत असल्याचा आरोप प्रतिभा सिंह यांनी केला. भाजपाने पैशाच्या जोरावर निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असंही म्हटलं आहे.
प्रतिभा सिंह यांच्या मते, जर ईव्हीएममध्ये छेडछाड झाली नाही तर राज्यातील सर्व जागांवर हैराण करणारे निकाल समोर येतील. मंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांचा विजय निश्चित असल्याचा दावा प्रतिभा सिंह यांनी केला. विक्रमी मतांनी विजयाचा झेंडा फडकवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मंडी लोकसभा मतदारसंघातील जनतेने याआधीही काँग्रेसला पाठिंबा दिला आहे आणि यावेळीही काँग्रेससोबत असल्याचं प्रतिभा सिंह म्हणाल्या. विक्रमादित्य सिंह यांनी मंडीसाठी विकासाचं विकासाचं व्हिजन ठेवलं आहे. विक्रमादित्य सिंह यांच्या व्हिजनवर जनतेने विश्वास व्यक्त केला असल्याचं देखील प्रतिभा सिंह यांनी म्हटलं आहे.