Himachal Political Crsis: हिमाचल विधानसभेच्या गेटवर मोठा गोंधळ, काँग्रेसच्या बंडखोर आमदारांवर हल्ल्याचा प्रयत्न, भाजपा आमदाराची प्रकृती खालावली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 12:55 PM2024-02-28T12:55:32+5:302024-02-28T13:03:09+5:30
Himachal Political Crsis : काँग्रेस समर्थकांची मोठी गर्दी जमली असून बंडखोर आमदारांना (Congress Rebel MLA) विरोध केला जात आहे.
Himachal Political Crsis : (Marathi News) शिमला : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Elections) निकालानंतर हिमाचल प्रदेशमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. दरम्यान, विधानसभेच्या गेटवर मोठा गोंधळ झाला. येथे काँग्रेस समर्थकांची मोठी गर्दी जमली असून बंडखोर आमदारांना (Congress Rebel MLA) विरोध केला जात आहे.
विधानसभेच्या बाहेरील बॅरिकेड्स तोडण्यात आले आहेत. याशिवाय, या आमदारांच्या वाहनांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारपासून काँग्रेसच्या सहा आमदारांसह एकूण 9 आमदार पंचकुलामध्ये तळ ठोकून होते. बुधवारी सकाळी हे आमदार पंचकुलाच्या ताऊ देवी लाल स्टेडियमवरून हेलिकॉप्टरने शिमल्याला रवाना झाले.
बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास काँग्रेसच्या सहा बंडखोर आमदारांसह एकूण नऊ आमदार विधानसभा संकुलात पोहोचताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच हरयाणा पोलिस कर्मचाऱ्यांना विधानसभेच्या गेटमध्ये प्रवेश कसा दिला गेला, असा सवालही केला.
दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राजीव बिंदलही घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी विधानसभेची सुरक्षा वाढवली आहे. गेटवर अधिक बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. क्यूआरटी आणि कमांडोही येथे तैनात करण्यात आले आहेत. हरयाणा पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर काढावे, अशी मागणी काँग्रेस समर्थकांची आहे.
विधानसभेत गदारोळ
दुसरीकडे, विधानसभेचे कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. ठीक 12 वाजता भाजपाचे आमदार पुन्हा सभागृहात पोहोचले आणि या वेळी पुन्हा गदारोळ झाला. यावेळी भाजपाचे रणधीर शर्मा यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांची मदत घेण्यात आली. रक्तदाब वाढल्याचे रणधीर शर्मा यांनी सांगितले. दरम्यान, भाजपाच्या आमदारांना मार्शल्सनी एक-एक करून उचलून सभागृहाबाहेर काढले आहे.