हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात 7 पोलिसांचा मृत्यू झाला. तीसा बैरागड रोडवरील तरवाई पुलाजवळ त्यांची कार येत असताना हा अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी गाडीत 12 जण प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि लोकप्रतिनिधी घटनास्थळी रवाना झाले आहेत.
कॅबिनेट मंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. "चंबा जिल्ह्यातील तीसा येथे पोलीस दलाच्या वाहन अपघातात 7 पोलीस कर्मचार्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे, तर 5 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत जखमी झालेले इतर पोलीस लवकरात लवकर बरे व्हावेत" असं अग्निहोत्री यांनी म्हटलं आहे.
शिमला, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार हंसराज यांनी सांगितले की, आज सकाळी चंबा येथे एक दुर्घटना घडली आहे. भाजपाच्या म्हणण्यानुसार सरकार आणि पीडब्ल्यूडीचे एक्सईएन यांचेा निष्काळजीपणा समोर आला आहे. आम्ही शासनाकडे सातत्याने विनवणी करून हा रस्ता बंद करून घेतला होता, मात्र शासनाने हा रस्ता पुन्हा सुरू केला. याची माहिती आम्ही सरकारला यापूर्वी दिली होती, मात्र सरकार गप्प बसलं. सतत डोंगर कोसळत होता, जनता पाहत होती, पण सरकारने काहीच कारवाई केली नाही.
पीडब्ल्यूडीमध्ये काम करणाऱ्या जोगिंदर शर्मा यांच्यावर तातडीने एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी भाजपाची मागणी आहे. त्यांच्या निष्काळजीपणामुळे आज चंबा येथे एवढी मोठी दुर्घटना घडली आहे. याबाबत आम्ही सरकारला सोशल मीडिया आणि लेखी माध्यमातून सातत्याने माहिती दिली होती. मात्र, हा अपघात रोखण्यासाठी सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. संपूर्ण राज्यात सरकारचे दुर्लक्ष सातत्याने दिसून येत आहे. या प्रकाराला आळा घातला नाही तर हिमाचलच्या जनतेला नेहमीच धोका असेल. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी समितीही स्थापन करावी. सरकारने आपली बाजू जनतेसमोर मांडली पाहिजे असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.