Himachal Pradesh assembly Election Results 2022: हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस भाजपाच्या पुढे निघाली; गुजरातपेक्षाही कमालीची उत्सुकता...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 08:49 AM2022-12-08T08:49:28+5:302022-12-08T08:49:55+5:30
Himachal Pradesh Results 2022: हिमाचल प्रदेशमध्ये कडवी टक्कर पहायला मिळत आहे.
गुजरातमध्ये भाजपाच जिंकणार हे आधीच स्पष्ट झालेले असताना हिमाचल प्रदेशच्या विधानसभेने देशभरात उत्सुकता वाढविली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये कडवी टक्कर पहायला मिळत आहे. यामुळे काँग्रेसच्या गोटात कमालीचे टेन्शन सुरु असून निवडून आलेले आमदार फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्याच्या निकालानुसार हिमाचल प्रदेशच्या ६८ जागांपैकी ४९ जागांवर मतमोजणी सुरु आहे. यापैकी २७ जागांवर काँग्रेसचे उमेदवार पुढे आहेत. तर भाजपाचे २२ जागांवर पुढे आहेत. इतर ४ जागांवर पुढे असून भाजपाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
भाजपा गेल्या वेळ पेक्षा १२ जागांनी मागे आहे. तर काँग्रेस ९ जागांवर पुढे आहे.
एक्झिट पोल काय सांगत होते...
इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियानुसार सत्ताधारी भाजपाला 24-34 जागा, काँग्रेसला 30-40, आपला भोपळा आणि इतरांना 4-8 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पी मार्कनुसार भाजपाला काठावर सत्ता राखताना दाखविले आहे. भाजपाला 34-39, काँग्रेसला 28-33, आपला एक जागा दाखविण्यात आली आहे. जन की बातचेही आकडे तसेच आहेत. भाजपाला 32-40, काँग्रेसला 27-34, इतरांना १-२ जागा दाखविण्यात आल्या आहेत. ETG-TNN नुसार भाजपाला ३८, काँग्रेसला २८, इतरांना दोन जागा दाखविण्यात आल्या आहेत. तर टीव्ही ९ नुसार भाजपाला ३३, काँग्रेसला ३१ आणि इतरांना ४ जागा दाखविण्यात आल्या आहेत.
ही हिमाचल प्रदेशच्या एक्झिट पोलची आकडेवारी पाहता भाजपा काठावर पास होण्याची शक्यता आहे. तसेच सत्तेसाठी इतरांची मदत घ्यावी लागणार आहे. काँग्रेसही त्याच आसपास असल्याने काँग्रेसलाही सत्ता स्थापन करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.