नवी दिल्ली- हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल हे प्रत्येक तासागणिक बदलत आहेत. दरम्यान, मतमोजणीला सुरुवात होऊन पाच तास लोटत असताना काँग्रेसने बाजी पलटवली आहे. तसेच ६८ जागा असलेल्या विधानसभेत ३९ जागांवर काँग्रेसने आघाडी घेत स्पष्ट बहुमताच्या दिशेने आगेकूच केली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये बहुमत मिळवण्यासाठी ३५ जागांची आवश्यकता असते.
हिमाचल प्रदेशमधील मतमोजणीमध्ये सुरुवातीला काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढाई सुरू होती. मात्र मतमोजणीच्या उत्तरार्धामध्ये काँग्रेसने आपली आघाडी वाढवत नेली. तर भाजपा पिछाडीवर पडत गेला. सध्याच्या कलांनुसार काँग्रेस ३९ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा २६ जागांवर आघाडीवर आहे. तर अपक्षांनी ०३ जागांवर आघाडी घेतली आहे.
काँग्रेसने सध्या बहुमतापेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली असली, तरी त्यांना एक भीती चांगलीच सतावतेय, ती म्हणजे ऑपरेशन लोटस. त्यामुळे हिमाचलमधील काँग्रेसने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. हिमाचल प्रदेशात विजयी झालेल्या आपल्या सर्व आमदारांना काँग्रेस चंदीगडला बोलावणार आहे. सूत्रांनी सांगितले की, हिमाचल प्रदेशातील विजयाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर काँग्रेसचे सर्व आमदार चंदीगडला पोहोचतील आणि तेथून त्यांना दुसऱ्या राज्यात नेले जाऊ शकते. हिमाचलमध्ये भूपेंद्र सिंह हुड्डा, भूपेश बघेल आणि राजीव शुक्ला विजयी काँग्रेस उमेदवारांचे नेतृत्व करतील, असे मानले जात आहे. भूपेंद्र हुडा अजूनही चंदीगडमध्येच आहे, तर भूपेश बघेल आणि शुक्ला लवकरच पोहोचणार आहेत.
दरम्यान, हिमाचल प्रदेशात १२ नोव्हेंबरला मतदान झाले होते. या निवडणुकीत राज्यातील एकूण ५५ लाख मतदारांपैकी सुमारे ७५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. हिमाचल प्रदेशातील विधानसभेत एकूण ६८ सदस्य असतात. या निवडणुकीत एकूण ४१२ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. हिमाचल प्रदेशमध्ये २०१७ च्या निवडणुकीत भाजपाने ४४ जागा जिंकत स्पष्ट बहुमतासह विजय मिळवला होता. मात्र दर पाच वर्षांनी सत्तांतराची परंपरा असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये यावेळी भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली होती. भाजपामधील सुमारे २२ नेत्यांनी बंडखोरी करून निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"