Himachal Assembly Elections 2022: आगामी गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकांसाठी सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. हिमाचलमध्ये भाजपचे अनेक बडे नेते मोठ-मोठ्या सभा घेत आहेत. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी कांगडा येथील चंबी मैदानावरून हिमाचलच्या जनतेला संबोधित कले. यावेळी त्यांनी भाजपच्या 'डबल इंजिन सरकार'चे कौतुक करण्यासोबतच काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
'काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार''काँग्रेस हिमाचलला स्थिर सरकार कधीच देऊ शकत नाही आणि देऊ इच्छित नाही. त्यांची फक्त दोन-तीन राज्यात सत्ता उरलीये. काँग्रेसच्या राज्यातून कधी विकासाच्या बातम्या येतात का? फक्त भांडणाच्या बातम्या येतात. काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, काँग्रेस म्हणजे विकासातील अडथळा. घराणेशाही, हाच काँग्रेसचा आधार आहे. असे सरकार कधीच विकास करू शकणार नाही,' अशी घणाघाती टीका पीएम मोदींनी केली.
ते पुढे म्हणाले की, 'उत्तराखंडच्या जनतेने जुनी परंपरा बदलून भाजपला विजय मिळवून दिला. उत्तर प्रदेशातही 40 वर्षांनंतर एखादा पक्ष सलग दुसऱ्यांदा सत्तेत आला. मणिपूरमध्येही पुन्हा भाजपचे सरकार आले आहे. अशी राजकीय परंपरा निर्माण करायची आहे की, मतदार आम्हाला पुन्हा पुन्हा संधी देतील. म्हणूनच आम्ही विकासासाठी आणि देशासाठी काम करत आहोत. काँग्रेस म्हणजे अस्थिरतेची हमी, काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळ्याची हमी आणि काँग्रेस म्हणजे विकासकामांमध्ये अडथळे आणण्याची हमी', असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
भाजपच्या कामांचा वाचला पाढा'केंद्र सरकारने उज्ज्वला योजना सुरू केली, हिमाचलच्या भाजप सरकारने गृहिणी योजना चालवून त्यात आणखी लोकांना जोडले. केंद्र सरकारने आयुष्मान योजना सुरू केली, हिमाचलच्या भाजप सरकारने हिमकेअर योजनेतून अधिक लोकांना जोडले. दुहेरी इंजिन सरकार असेच काम करत आहे. काँग्रेस सरकारने पेन्शनचे वय 80 वर्षे केले आणि कमाईची अटही ठेवली. भाजप सरकारने पेन्शनचे वय 60 वर्षे केले आणि कमाईची अटही हटवली. याचा फायदा लाखो ज्येष्ठ नागरिकांना झाला. प्रत्येकाला सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी केंद्र सरकारने पेन्शन आणि विमा योजना सुरू केल्या. शेतकरी, मजूर आणि छोट्या दुकानदारांना नियमित 3 हजार रुपये पेन्शन मिळावी यासाठी आम्ही मार्ग काढला,' असा योजनांचा पाढाही मोदींनी वाचला.