नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. यासाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. तसेच, या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे. यातच समाजवादी पार्टीचे नेते आझम खान वादग्रस्त विधाने करुन चर्चेत असतानाच आता हिमाचल प्रदेशचेभाजपा प्रदेशाध्यक्ष सतपाल सिंह सत्ती यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
एएनआयने एक व्हिडीओ जारी केला आहे. हा व्हिडीओ 13 एप्रिलचा आहे. यामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष सतपाल सिंह सत्ती यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात अभद्र टिप्पणी केली. ते म्हणाले, 'भैया, तुझ्या आईला जामीन मिळाला आहे, तुला जामीन मिळाला आहे. तुझ्या भावोजीला जामीन मिळाला आहे. पूर्ण टब्बरही जामीनावर आहे. भाई, तू कोण आहेस. जो न्यायाधीशासारखे चोर म्हणणारा.' अशाप्रकारे एकेरी उल्लेख करत सतपाल सिंह सत्ती यांनी राहुल गांधीवर निशाणा साधला. याचबरोबर, 'जर या देशाचा चौकादार चोर आहे, आणि तू बोलतो आहेस तर तू ****** आहेस.' अशी फेसबुकवरील पोस्ट राहुल गांधींच्याविरोधात व्यासपीठावरुन उपस्थितांसमोर सतपाल सिंह सत्ती यांनी वाचून दाखविली.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राफेल डीलवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केले आहे. या राफेल डीलवरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौकीदार चोर है, असे म्हणत एकप्रकारे मोहीम सुरू केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात राजस्थानात झालेल्या रॅलीत राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है, अशी देशाची नवी मोहीम असेल, असे म्हटले होते.