सिमला - हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाचे कमळ फुलले असून काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. पण भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेम कुमार धुमल मात्र सुजनपूर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. प्रेम कुमार धुमल यांचा पराभव झाल्याने हिमालचमध्ये भाजपा समोर मुख्यमंत्रीपदाचा पेच निर्माण झाला आहे. कारण पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी हिमाचलमध्ये प्रेम कुमार धुमल यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत असल्याचे जाहीर केले होते.
धुमल यांच्या जागी केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा पर्याय ठरु शकतात. ते मोदी यांचे निकटवर्तीय समजले जातात. धुमल हे ठाकूर समाजातील असून, हिमाचलमध्ये ठाकूर समाजाची लोकसंख्या 28 टक्के आहे. सामाजित समीकरणे लक्षात घेऊनच भाजपाने अखेरच्या क्षणी प्रेम कुमार धुमल यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर केले होते. धुमल यांनी दोनवेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. 68 जागा असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाने 41 आणि काँग्रेस 23 जागांवर आघाडीवर आहे. हिमाचल प्रदेशमध्ये बहुमतासाठी 35 जागांची आवश्यकता आहे.
मागच्या आठवडयात बहुतांश एक्झिट पोल चाचण्यांमधून हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाचे सरकार येईल असा अंदाज वर्तवला होता. हिमाचल प्रदेशमध्ये नेहमीच सत्तांतराचा इतिहास राहिला आहे. दर पाच वर्षांनी इथे आलटून-पालटून भाजपा आणि काँग्रेसचे सरकार येत असते. सध्या हिमाचलमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. 68 जागांसाठी हिमाचल प्रदेशात 75 टक्के मतदान झाले होते. गुजरातच्या 33 जिल्ह्यांतील 37 केंद्रांवर मतमोजणी होत आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्ये 42 केंद्रांवर मतमोजणी होत असून, सर्वत्र कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.