हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आजी आणि नातीसह तिघांचा मृत्यू झाला आहे तर आठ जण जखमी झाले आहेत. कारमधील सर्व लोक मंदिरातून पूजा करून घरी परतत होते आणि याच दरम्यान ते अपघाताचे बळी ठरले. सध्या चंबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जखमींना चंबा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. चंबा येथील माणी-सिंढकुंड रस्त्यावर बोलेरो वाहनाचा अपघात झाला. कारमध्ये एकूण 11 जण होते. यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. घटनेनंतर पोलीस प्रशासनाने घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय चंबा रुग्णालयात आणले.
आठ जखमींमध्ये चार मुले, तीन महिला आणि चालकाचा समावेश आहे. चालकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. प्रशासनाच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना 25-25 हजार आणि जखमींना 5-5 हजारांची तातडीची मदत देण्यात आली आहे. चंबा येथील राजपूर गावातील कुटुंब आणि नातेवाईक दवाट महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले होते.
परतत असताना टरियू वळणावर वाहन रस्त्यावर उलटलं. आवाज ऐकून गावकरी घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांनाही माहिती देण्यात आली. या अपघातात एका मुलासह दोन महिलांचा मृत्यू झाला. आजी आणि नातीचा त्यात समावेश होता. तर जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.