Himachal Pradesh Political Crisis:हिमाचल प्रदेशात काल, म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी बंडखोरी केली, ज्यामुळे भाजपाचा उमेदवार विजयी झाला. यानंतर, दिवंगत माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला, ज्यामुळे राज्य सरकार अडचणीत आले होते. भाजपावाले सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत होते. पण, आता काँग्रेससाठी एक चांगली बातमी आली आहे.
राजीनामा परत घेतलादिवसभराच्या राजकीय गोंधळानंतर काँग्रेस सरकारसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. राज्य सरकारमधील पीडब्यूडी मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे. याबाबत विक्रमादित्य म्हणाले, "संघटना मजबूत करणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. पक्षाच्या व्यापक हितासाठी आणि एकात्मतेसाठी मी दिलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारण्यास नकार दिला. आता मलाही हे प्रकरण आणखी वाढवण्यात रस नाही. आता आमच्या सरकारला कोणताही धोका नाही," असे ते मीडियाशी बोलताना म्हणाले.
बंडखोरांची हकालपट्टी होणार?पक्षविरोधी काम केल्यामुळे त्या सहा बंडखोर आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. याबात काँग्रेसचे मुख्य व्हीप हर्षवर्धन चौहान म्हणाले, “आम्ही सहा बंडखोर आमदारांची हकालपट्टी करण्याची मागणी करणारी याचिका सभापतींकडे सादर केली. आज दुपारी एक वाजता सुनावणी झाली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी त्यांचे युक्तिवाद सभापतींसमोर मांडले आणि आम्हाला आशा आहे की सभापती त्यावर लवकरच निर्णय घेतील.”
दिवसभरात काय घडले?विक्रमादित्य सिंह यांनी बुधवारी सकाळी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा जाहीर करताना त्यांनी आपल्या वडिलांची तुलना शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांच्याशी केली. पत्रकार परिषदेत वडिलांची आठवणीत विक्रमादित्य भावूक झाले. संपूर्ण निवडणूक वीरभद्र सिंह यांच्या नावावर लढवली गेली. ज्या व्यक्तीमुळे हिमाचलमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाले, त्यांचा पुतळा बसवण्यासाठी शिमल्यातील मॉल रोडवर 2 यार्ड जमीन देण्यात आली नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे, असं ते म्हणाले होते.