हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यासह आईवर कौटुंबिक छळाचा आरोप, अजामिनपात्र वॉरंट जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 10:40 AM2022-12-14T10:40:17+5:302022-12-14T10:41:42+5:30
Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र आणि काँग्रेसचे आमदार विक्रमादित्य सिंह यांच्याविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट जारी झालं आहे. पत्नीला मारहाण आणि कौटुंबिक छळ केल्याप्रकरणी हे वॉरंट जारी झालं आहे.
सिमला - हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र आणि काँग्रेसचे आमदार विक्रमादित्य सिंह यांच्याविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट जारी झालं आहे. पत्नीला मारहाण आणि कौटुंबिक छळ केल्याप्रकरणी हे वॉरंट जारी झालं आहे. राजस्छथानमधील उदयपूरच्या स्थानिक कोर्टामध्ये हे प्रकरण विचाराधीन आहे. तसेच १४ डिसेंबर म्हणजेच बुधवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. या प्रकरणामुळे हिमाचल प्रदेशमध्ये मंत्रिपद मिळवण्याच्या शर्यतीत असलेल्या विक्रमादित्य सिंह यांना मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सिमला ग्रामीण येथील आमदार विक्रमादित्य सिंह यांची पत्नी सुदर्शना चंडावत यांनी पती आणि कुटुंबीयांविरोधात उदयपूरमधील कोर्टामध्ये कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार १७ ऑक्टोबर २०२२ रोजी दिली होती. १७ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या पहिल्या सुनावणीवेळी अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी उदयपूर यांच्या कोर्टाने विक्रमादित्य सिंह, सासू प्रतिभा सिंह, नणंद अपराजिता, नंदोई अंगद सिंह आणि चंडीगडमधील एका तरुणीविरोधीत अजामिनपात्र वॉरंट जारी केले. सर्व प्रतिवादींना उदयपूर कोर्टामध्ये बुधवार १४ डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विक्रमादित्य सिंह यांची पत्नी सुदर्शना हिने कौटुंबिक हिंसाचाराबाबतच्या महिला संरक्षण अधिनियम कलम २० अन्वये कोर्टात तक्रार दिली आहे. लग्नानंतर काही दिवसांनी कौटुंबिक हिंसा झाली. तक्रारकर्तीने कोर्टाला विनंती केली की, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक हिंसा होऊ नये यासाठी आपल्याला वेगळं घर देण्याचे आदेश सासरच्या मंडळींना द्यावेत.
विक्रमादित्य सिंह यांचा विवाह मार्च २०१९ मध्ये मेवाड राजवंशातील राजकुमारी सुदर्शन चुंडावर हिच्याशी झाला होता. दोघांमध्ये लग्नानंतर काही दिवसांनी मतभेद झाले होते. त्यानंतर बऱ्याच काळापासून ते वेगळे राहत होते. दरम्यान, विक्रमादित्य सिंह यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.