हिमाचल प्रदेशमध्ये सत्तांतर होणार का ? भाजपा आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 09:22 AM2017-11-06T09:22:45+5:302017-11-06T09:22:57+5:30
दर पाच वर्षांनी सत्तापालट घडवून आणणारे हिमाचल प्रदेशचे मतदार यावेळेसही सत्तापालट घडवून भाजपाच्या पारड्यामध्ये आपल्या मतांचे वजन टाकणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मुंबई - दर पाच वर्षांनी सत्तापालट घडवून आणणारे हिमाचल प्रदेशचे मतदार यावेळेसही सत्तापालट घडवून भाजपाच्या पारड्यामध्ये आपल्या मतांचे वजन टाकणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ही निवडणूक काँग्रेस आणि सध्याचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्यासाठी जितकी महत्त्वाची आहे तितकीच भाजपासाठी आहे. या निवडणुकीच्या निकालाचा थेट संबंध केंद्र सरकारच्या कामाशी आणि पाठोपाठ होत असलेल्या गुजरात निवडणुकीशी लावला जाणार असल्यामुळे या दोन्ही पक्षांनी जोरदार तयारी केली आहे.
१९६७ पर्यंत या राज्यात केवळ काँग्रेसचीच एकहाती सत्ता होती. १९६६ साली पंजाबमधील काही प्रदेश राज्याला जोडल्यानंतर काँग्रेसला ६० पैकी केवळ ३४ जागा जिंकता आल्या होत्या. पण काँग्रेसला खरा धक्का बसला तो आणीबाणीच्या काळामध्ये. १९८५ पासून राज्यामध्ये जनतेने एकदा काँग्रेस आणि एकदा भाजपा असा आलटून पालटून कौल दिला आहे. अधिक स्पष्ट करायचे झाले तर एकदा वीरभद्र सिंह आणि एकदा प्रेमकुमार धूमल असे म्हणता येईल. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतसिंग परमार यांच्या १८ वर्षांच्या कार्यकाळानंतर वीरभद्र सिंह यांना सर्वाधिक काळ म्हणजे २२ वर्षे मुख्यमंत्रिपद मिळाले आहे तर भाजपाच्या धूमल यांना १० व त्यापाठोपाठ शांताकुमार यांना ५ वर्षे मुख्यमंत्रिपदावर राहता आले.
बेहिशेबी मालमत्तेची प्रकरणे, २०१४ ची मोदी लाट, मतदारांचे पाच वर्षांनी दुस-या पक्षाला निवडणे यासर्व मुद्यांमधून काँग्रेसचे वीरभद्र सिंग पुन्हा यशस्वी होणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेसने उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे हिमाचलमधील नेते आनंद शर्मा यांच्या प्रचाराच्या सभा आयोजित केल्या तर भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, जगतप्रकाश नड्डा , शांताकुमार, अनुराग ठाकूर अशी फौज प्रचारात उतरवली.
९ तारखेस सर्व ६८ मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून १८ तारखेस जनतेचा कौल स्पष्ट होईल. हिमाचल प्रदेशचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महिला मतदारांचे पुरष मतदारांइतकेच जवळजवळ समप्रमाण या राज्याच आहे. काही मतदारसंघात महिलांचे प्रमाण अधिक आहे. चंबा, लाहूल आणि स्पीती, किनौर, कांग्रा, कुलू, शिमला, मंडी, हामिरपूर, उना, सोलन, सिरमौर असे राज्याचे प्रशासकीय विभाग आहेत.