शिमला: हिमाचल प्रदेश(Himachal Pradesh) मधील मंडी लोकसभेसह तीन विधानसभेच्या जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा दारुन परभाव झाला आहे. चारही जागांवर काँग्रेसने मोठा विजय मिळवलाय. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचा गृहजिल्हा असलेल्या मंडी लोकसभेची जागाही भाजपला वाचवता आली नाही. याशिवाय अर्की, फतेहपूर आणि जुब्बल-कोटखई या ठिकाणी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपचा मोठा पराभव झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंडी लोकसभेच्या जागेवर काँग्रेसच्या प्रतिभा सिंह यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. काँग्रेस उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांनी मंडी लोकसभा मतदारसंघातून 8766 मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली आहे. त्यांना 365650 मते मिळाले, तर भाजपचे उमेदवार कुशल सिंह ठाकूर यांना 356884 मते मिळाली. पोटनिवडणुकीत एकूण 742771 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यापैकी 12626 जणांनी NOTA चे बटण दाबले आहे.
विधानसभेचे निकालजुब्बल-कोटखाई विधानसभा मतदारसंघ: रोहित ठाकूर(काँग्रेस) यांना 29447 मते, चेतन ब्रगटा (अपक्ष) यांना 23344 आणि नीलम सराईक (भाजप) यांना जुब्बल-कोटखई जागेवरून केवळ 2584 मते मिळाली. भाजप उमेदवाराला आपले डिपॉझिटही वाचवता आले नाही.
फतेहपूर विधानसभा मतदारसंघः फतेहपूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भवानी सिंह पठानिया यांनी 5789 मतांनी विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या 24 टप्प्यांत भाजपचे उमेदवार बलदेव ठाकूर यांना 18,660, भवानी सिंह पठानिया यांना 24449 आणि जनक्रांती पक्षाचे पंकज दर्शी यांना 375, अशोक सोमल(अपक्ष) 295 तसेच अपक्ष उमेदवार डॉ. राजन सुशांत यांना 12927 मते मिळाली. येथे तिरंगी लढत झाली असली तरी काँग्रेसने येथून विजयाची हॅट्ट्रिक केली आहे.
अर्की विधानसभा मतदारसंघ : अर्की विधानसभा जागा पुन्हा एकदा काँग्रेसच्या गोटात गेली आहे. याआधी वीरभद्र सिंह आमदार होते, मात्र त्यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली. आता येथून संजय अवस्थी विजयी झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
हिमाचल प्रदेशमध्ये भाजपच्या पराभवावर मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी पोटनिवडणुकीतील पराभव मान्य केला आहे. शिमल्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही जनादेश स्वीकारतो आणि 2022 पूर्वी उणिवा दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पक्षांतर्गत काही लोकांनी आत राहूनही पक्षाची कामे केलेली नाहीत, त्यांची यादी तयार करून पक्ष हायकमांडला पाठवणार आहे.