Himachal Pradesh Rains: हिमाचल प्रदेशात पावसाने कहर केला आहे. पंजाब आणि हिमाचलला जोडणारा रेल्वेचा चक्की पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याची घटना घडली आहे. पावसामुळे सातत्याने पाण्याची पातळी वाढत असलेल्या चक्की नदीतील ऐतिहासिक पूल बघता बघता त्याच नदीत वाहून गेला. कांगडा येथील चक्की रेल्वे पुलामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुदैवाने रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. सध्याही मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलन होत असून त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम होत आहे. एकीकडे चक्का नदीवरील पूल नदीत वाहून गेला तर दुसरीकडे भूस्खलनामुळे एक बसचा ताबा सुटून ती दरीच्या टोकापर्यंत गेली. मात्र सुदैवाने बस दरीत पडण्यापासून वाचली.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि भूस्खलनामुळे अनेक घरे कोसळली तर काही घरांचे नुकसान झाले आहे. धर्मशाला-कांगडा राष्ट्रीय महामार्गावरील साकोहमध्ये दरड कोसळल्याने रस्ता तीन तास बंद होता. जिल्हा मंडईतील नौहाळी मार्गे पदर-जोगिंदरनगर या मार्गावर डोंगरावरील दगड आणि खड्यांचा ढिगारा पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील चंबा भरमौर पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यात अडकलेली एक बस थोडक्यात बचावली. चंबा येथील डलहौसीहून पटियालाला जाणारी बस आज म्हणजेच शनिवारी सकाळी रस्त्याचा काही भाग खचल्याने अपघातग्रस्त झाली. पण सुदैवाने दरीत पडण्यापासून ही बस बचावली.
या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा- हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. IMD ने कांगडा, कुल्लू, मंडी, शिमला, सोलन, सिरमौर, उना, हमीरपूर आणि बिलासपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अतिवृष्टी झाल्यास दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत स्थानिक प्रशासनाकडून लोकांसाठी सूचना जारी करण्यात आली आहे. स्थानिक लोकांना आणि पर्यटकांना नद्या आणि नाल्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.