शिमला : कोरोनाचे सावट असतानाही नियम आणि निर्बंधांचे पालन करत महाशिवरात्रीचे (Mahashivratri) पर्व संपूर्ण देशभरात उत्साहात साजरे करण्यात आले. यानिमित्ताने हिमाचल प्रदेशमधील राम मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात राज्याचे शहरविकास मंत्री सुरेश भारद्वाज (Suresh Bhardwaj) यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबद्दल मोठे विधान केले आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी महादेव शंकराचे अवतार आहेत. त्यांना शिवाचे वरदान मिळाले आहे, असे सुरेश भारद्वाज यांनी म्हटले आहे. (himachal pradesh minister suresh bhardwaj claims that pm narendra modi is incarnation of lord shiva)
हिमाचल प्रदेशातील एक मंत्री सुरेश भारद्वाज यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यापूर्वी पंतप्रधान मोदी दोन दिवस केदारनाथ येथील गुहेमध्ये ध्यानाला बसले होते. पंतप्रधान मोदींना भगवान शंकराचे वरदान मिळाले आहे, असेही ते म्हणाले.
गेल्या ४ वर्षांत १७० आमदारांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; भाजपचा आकडा किती? पाहा
पंतप्रधान मोदी वैश्विक नेते
कोरोनाच्या कालावधीत पंतप्रधान मोदींनी या संकटाला ज्या पद्धतीने तोंड दिले, ते पाहता त्यांच्याकडे आता जागतिक स्तरावरील नेता म्हणून पाहिले जाऊ लागले आहे, असेही सुरेश भारद्वाज यांनी म्हटले आले. पंतप्रधान मोदींना महादेव शंकराचे वरदान लाभले आहे. पंतप्रधान मोदी हे महादेवांचे रुप आहे. त्यामुळेच देशाला करोनासारख्या संकटापासून वाचवलं, असे भारद्वाज यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
पंतप्रधान महादेवांचे अवतार
देशव्यापी कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर मोदींची प्रतिमा अधिक मोठी झाली आहे. जगभरामध्ये करोनाची लस बनवणाऱ्या सर्व देशांमध्ये भारताने आघाडी घेतली आहे. भारत हा एकमेव असा देश आहे, ज्याने दोन लसींची निर्मिती केली आहे. आता जगभरातील इतर देश भारताकडून लसीसंदर्भात मदत मागत आहेत. देशातील कोरोना मृत्युदर कमी झाला, याचे श्रेयही पंतप्रधान मोदींना जाते, असा दावा भारद्वाज यांनी केला आहे.