गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने उत्तर भारतात झोडपून काढलं आहे. हिमाचल प्रदेश-उत्तराखंडसारख्या डोंगराळ राज्यांमध्ये ढगफुटीमुळे पूर आणि भूस्खलनाच्या घटना वाढल्या आहेत. पाण्याच्या जोरदार प्रवाहात रस्ते आणि पूलही वाहून गेले आहेत. दरम्यान, हिमाचलच्या मंडीत अडकलेल्या लोकांच्या सुटकेचा थरारक व्हिडिओ व्हायरल होतोय.
मिळालेल्या माहितीनुसार, मंडी जिल्ह्यातील नागवाईन गावात 9 जुलैच्या रात्रीपासून काही लोक अडकून पडले होते. त्यांच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या टीमला बोलवण्यात आले. नदीलापूर आल्याने त्या लोकांच्या बचाव कार्यात अडचणी येत होत्या. अखेर दोरीच्या साह्याने त्या लोकांना वाचवण्यात आले.
एएनआयने या बचावाचा व्हिडिओही शेअर केला आहे. वृत्तसंस्थेनुसार, मुसळधार पावसामुळे बियास नदीच्या पाण्याची पातळी चांगलीच वाढली होती, त्यामुळे मंडी जिल्ह्यातील नागवाईन गावाजवळ सहा जण अडकले होते. एनडीआरएफच्या टीमने रविवारी रात्री उशिरा रेस्क्यू ऑपरेशन राबवत त्या लोकांना वाचवले.
हिमाचलच्या मंडीमध्ये नदीच्या पाण्याचा प्रवाह इतका वाढला आहे की, व्हिक्टोरिया ब्रिजलाही तडा गेला आहे. येथील पंचबख्त मंदिर व इतर पुलांचीही दुरवस्था झाली आहे.