धर्मशाळा: भारतात अनेकदा खलिस्तानच्या मागणीसाठी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच पंजाबमध्ये दोन गटात तुफान हाणामारी आणि दगडफेक झाली होती. पंजाबमध्ये खलिस्थान समर्थिक लोकांकडून अशा घटना घडवल्या जातात. पण, आता पंजाबसोबत तिकडे हिमाचल प्रदेशातही खलिस्थानची मागणी होताना दिसत आहे. हिमाचल प्रदेशच्या विधानसभा भवनाच्या गेटवर खलिस्थानी झेंडे लावण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज(रविवारी) सकाळी हिमाचल प्रदेश विधानसभेच्या गेटवर खलिस्तानी झेंडे आढळून आले. हे झेंडे विधानसभेच्या भिंतीला आणि मुख्य गेटला बांधलेले आढळले. याप्रकरणी पोलिसांचे म्हणणे आहे की, ही घटना रात्री उशिरा किंवा रविवारी पहाटे घडली असावी. एसपी कुशल शर्मा यांनी सांगितल्यानुसार, सध्या विधानसभेच्या गेटवरुन हे खलिस्तानी झेंडे हटवले आहेत. पंजाबमधून आलेल्या काही पर्यटकांचे हे कृत्य असू शकते, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या लोकांनी विधानसभेच्या गेटवर आणि भिंतीवर हे खलिस्तानचे झेंडे पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. झेंड्यांवर पंजाबी भाषेत खलिस्तान लिहिले होते. आता हिमाचलच्या कांगडामध्ये खलिस्तानींचे झेंडे कसे लावले गेले, असा प्रश्न सुरक्षा यंत्रणांवर उपस्थित केला जात आहे. विधानसभेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे का नाहीत, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आज याप्रकरणी गुन्हा दाखल होईल.