हिमाचलमध्ये भाजपा सत्तांतराचा ट्रेंड बदलणार की काँग्रेस चमत्कार घडवणार? समोर आला असा कल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 07:19 PM2022-11-04T19:19:57+5:302022-11-04T19:20:54+5:30
himachal pradesh opinion poll 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये दर पाच वर्षांनी सत्तांतराचा ट्रेंड गेल्या काही निवडणुकांपासून सुरू आहे. त्यामुळे यावेळी हा सत्तांतराचा ट्रेंड कायम राहणार की, भाजपा सत्ता कायम राखणार, याबाबत उत्सुकता आहे.
नवी दिल्ली - हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी १२ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदार ६८ आमदारांच्या भवितव्याचा फैसला करणार आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये दर पाच वर्षांनी सत्तांतराचा ट्रेंड गेल्या काही निवडणुकांपासून सुरू आहे. त्यामुळे यावेळी हा सत्तांतराचा ट्रेंड कायम राहणार की, भाजपा सत्ता कायम राखणार, याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, या निवडणुकीपूर्वी विविध वाहिन्यांचे ओपिनियन पोल समोर येऊ लागले आहेत.
इंडिया टीव्हीने केलेल्या ओपिनियनमधून हिमाचल प्रदेशमध्ये यावेळी दर पाच वर्षांनी होणाऱ्या सत्तांतराचा ट्रेंड बदलणार असल्याचा कल वर्तवण्याक आला आहे. या ओपिनियन पोलनुसार भाजपाला ४६ टक्के, काँग्रेसला ४२ टक्के आणि आपला केवळ २ टक्के जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे यावेळी हिमाचलमध्ये सत्तेसाठी भाजपा आणि काँग्रेसमध्ये कडवी टक्कर होण्याची शक्यता आहे.
इंडिया टीव्हीच्या ओपिनियन पोलमध्ये यावेळी हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाला ४१ तर काँग्रेसला २५ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर इतरांच्या खात्यामध्ये दोन जागा जाण्याची शक्यता आहे. मात्र मोठा गाजावाजा करणाऱ्या आम आदमी पक्षाला हिमाचल प्रदेशमध्ये खातेही उघडता येणार नाही, असा अंदाज या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकींसाठीच्या प्रचाराने जोर धरला आहे. वेगवेगळी आश्वासने सर्वच पक्षांकडून दिली जात आहेत. आता हिमाचल प्रदेशमध्ये एकूण ६८ जागांसाठी १२ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.