हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मंडी येथे पोहोचले होते. येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना, 'कमळाचे फूल' हेच भाजप आहे. कमळाच्या फुलाला मिळालेले मत आपल्याला मजबूत करेल, असे मोदी यांनी म्हटले होते. यानंतर काँग्रेसने एक व्हिडिओ शेअर करत, पीएम मोदींनी स्वतः एक बंडखोर नेत्याला फोन केल्याचे म्हटले आहे.
काँग्रेस नेते श्रीनिवास यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि दावा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यातील फतेहपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या कृपाल परमार यांना निवडणुकीतून माघार घेण्यास सांगितले आहे. एवढेच नाही, तर या व्हिडिओनुसार मी काहीही ऐकनार नाही, माझा तुम्यावर अधिकार आहे, असेही मोदींनी म्हटले आहे.
या व्हिडिओनुसार कृपाल परमार यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची पंतप्रधान मोदींकडे तक्रारही केली. ते म्हणाले, नड्डा 15 वर्षांपासून आपला अपमान करत आहेत. मोदी म्हणाले, जर माझा आपल्या आयुष्यात काही रोल असेल तर, यावर परमार म्हणाले, आपला मोठा रोल आहे. मात्र, या व्हिडिओची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. लोकमतही याची पुष्टी करत नाही.
हिमाचल विधानसभेच्या एकूण 21 जागांवर भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. यांत मंडीचे प्रवीण शर्मा, बिलासपूरमध्ये सुभाष ठाकुर, बंजारमध्ये हितेश्वर सिंह, किन्नौरमध्ये तेजवंत नेगी, चंबामध्ये इंदिरा ठाकुर, बडसरमध्ये संजीव शर्मा, नूरपूरमध्ये कृपाल परमार, देहरामध्ये होशियार सिंह, आनीमध्ये किशोरी लाला, करसोगमध्ये युवराज कपूर, नालागडमध्ये केएल ठाकुर आदी बड्या नेत्यांचा समावेश आहे.