शिमला : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यभरातून विध्वंसाच्या बातम्या समोर येत आहेत. पण, अशा कठीण परिस्थितीमध्येही एका कुटुंबाने आनंदोत्सव साजरा केला आहे. शिमल्यातील एका तरुणाचे लग्न ठरले होते, पण पावसामुळे तो कुणीच लग्नाला जाऊ शकले नाही, यानंतर कुटुंबाने शक्कल लढवत चक्क ऑनलाईन लग्न केले.
सविस्तर माहिती अशी की, शिमला जिल्ह्यातील कोटगढ येथील रहिवासी आशिष सिंघा, याचे कुल्लू जिल्ह्यातील भुंतर येथे राहणाऱ्या शिवानी ठाकूरशी लग्न जमले होते. आशिष आणि शिवानीचे लग्न सोमवारी(दि.10) रोजी होणार होते, पण मुसळधार पावसामुळे लग्न रद्द करण्याची वेळ आली. पण, अखेर त्यांनी एक शक्कल लढवली आणि ऑनलाइन लग्न करण्याचा निर्णय घेतला.
या जोडप्याने ना सात फेरे घेतले, ना एकमेकांना हार घातले, ना सिंदूर लावला, ना मंगळसूत्र घातले. व्हिडिओ कॉलद्वारे वधून आणि वर समोरासमोर आले आणि पुजाऱ्याने व्हिडिओ कॉलवरच मंत्रोच्चार म्हणथ त्यांचे लग्न लावून दिले. शक्य होतील तितके विधी ऑनलाईन पार पडले. आता या अनोख्या ऑनलाईन लग्नाची चर्चा राज्यभर रंगत आहे.
वधू-वराच्या नातेवाईकांनी सांगितले की, पावसामुळे हिमाचलकडे जाणारे रस्ते बंद झाले आहेत. या पावसात लग्नाची वरात नेणे अशक्य होते. अशा परिस्थितीत लग्न रद्द करण्याऐवजी ऑनलाइन लग्नाची कल्पना सुचली. यानंतर दोन्ही कुटुंबात सहमती झाली आणि वधू-वराचे ऑनलाइन लग्न झाले. इंटरनेटमुळे हा ऑनलाईन विवाह कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडला.