Himachal Pradesh Spiti Valley :हिमाचल प्रदेशच्या लाहौल-स्पीती (Spiti Valley) मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाल्यामुळे एका पर्यटकाने चक्क चंद्रा नदीत Thar उतरवली. यावेळी कुणीतरी त्याचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. हा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर चालकाला चालान बजावण्यात आले. तसेच, असा प्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी त्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
नवीन वर्षाची सुट्टी साजरी करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने हिल स्टेशनवर पोहोचत असून, यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कुल्लू जिल्ह्यात पर्यटकांच्या गर्दीमुळे लाहौल-मनाली रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांत रोहतांगमधील अटल बोगद्यातून सुमारे 55,000 वाहने गेली आहेत.
लाहौल जिल्ह्याचे एसपी मयंक चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जामपासून सुटका करण्यासाठी या पर्यटकाने आपली महिंद्रा थार चंद्रा नदीत उतरवली. सध्या चंद्रा नदीच्या पाण्याची पातळी फार कमी असल्याने त्याला नदीतून गाडी चालवणे सहज शक्य झाले आणि सुदैवाने तो दुर्घटना होण्यापासून दूर राहिला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याप्रकरणी चालकाविरुद्ध मोटार वाहन कायदा, 1988 अंतर्गत 3 हजार 500 रूपयांचा चालान जारी करण्यात आला आहे.