हाहाकार! हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये पावसाचे थैमान; 51 जणांचा मृत्यू, परिस्थिती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 10:27 AM2023-08-15T10:27:06+5:302023-08-15T10:54:16+5:30
राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. भूस्खलनाने राज्यातील अनेक प्रमुख रस्ते बंद आहेत, घरांचे नुकसान झाले आणि शिमला येथील मंदिरात अनेक भाविक अडकले.
हिमाचल प्रदेशमध्ये अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे झालेल्या विध्वंसात आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 14 जणांचा मृत्यू शिमल्यामध्ये भूस्खलनामुळे झाला आहे. राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. भूस्खलनाने राज्यातील अनेक प्रमुख रस्ते बंद आहेत, घरांचे नुकसान झाले आणि शिमला येथील मंदिरात अनेक भाविक अडकले. शिमल्यात दोन भूस्खलनाच्या ठिकाणांवरून 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले. समर हिल परिसरातील शिवमंदिराच्या ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
भूस्खलन झाले तेव्हा मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती, ते सोमवारी भगवान शंकराच्या दर्शनासाठी आले होते. तर मंडी जिल्ह्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 19 जणांचा मृत्यू झाला. हिमाचल प्रदेशात, स्थानिक हवामान खात्याने 17 ऑगस्टपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस, वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याचा यलो अलर्ट जारी केला आहे. हिमाचल प्रदेशात 19 ऑगस्टपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसामुळे राज्य सरकारनेही परीक्षा रद्द केल्या असून शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये सोमवारी झालेल्या पावसामुळे झालेल्या मोठ्या विध्वंसाबद्दल, राज्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू म्हणाले की, गेल्या 24 तासांत 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 20 हून अधिक लोक अजूनही अडकले आहेत, मृतांचा आकडा वाढू शकतो. शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. राज्यात स्वातंत्र्यदिनी कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उत्तराखंडमध्ये, भारतीय हवामान विभागाने (IMD) आजही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने सांगितले की, डेहराडून, पौरी, टिहरी, नैनिताल, चंपावत आणि उधम सिंह नगरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे ऋषिकेशच्या आसपासच्या भागात अनेक ठिकाणी पाणी साचले असून गंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. एसडीआरएफचे पथक ठिकठिकाणी बचाव कार्यात गुंतले आहेत. चमोलीच्या पीपलकोटी नगर पंचायतीच्या मायापूरमध्ये मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. पीपलकोटी येथील डोंगरावरून मोठ्या प्रमाणात माती खाली आल्याने अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली गेली असून रस्ते बंद झाले आहेत.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ऋषिकेशमधील पूरग्रस्त भाग आणि गंगा नदीच्या वाढत्या पाण्याच्या पातळीचे हवाई सर्वेक्षण केले. पौरी गढवालमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे अलकनंदा नदीला पूर आला आहे. चमोली येथे सततच्या मुसळधार पावसामुळे बद्रीनाथ महामार्गावर मायापूरमध्ये डोंगरावरून आलेल्या ढिगाऱ्याखाली अनेक वाहने गेली. पौडी जिल्ह्यातील मोहनचट्टी येथे मुसळधार पावसामुळे एक रिसॉर्ट कोसळलं, ज्यामध्ये 5 लोक गाडले गेले. हे सर्व लोक हरियाणातील कुरुक्षेत्र येथील रहिवासी आहेत. पोलीस आणि एसडीआरएफने घटनास्थळी शोधमोहीम राबवली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.