मुंबई- आयपीएस अधिकारी हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येच्या बातमीने सगळीकडेच खळबळ उडाली आहे. डॅशिंग अधिकारी हिमांशू रॉय यांच्या एक्झिटमुळे सगळीकडूनच हळहळ व्यक्त केली जाते आहे. मोठं व्यक्तिमत्व असलं तरी अगदी साधी-सरळ राहणी व सगळ्यांशी साधेपणाने बोलण्याची शैली असणाऱ्या या 'सुपरकॉप'बद्दलच्या अनेक आठवणी आहेत. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हिमांशू रॉय यांच्याबद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत.
'हिमांशू रॉय यांचा स्वभाव हा सगळ्यांनाच भुरळ पाडणारा होता. पोलीस दलातील शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत अगदी सगळ्यांशीच ते अदबीने बोलायचे. त्यांनी कधीही कुणाचा एकेरी शब्दात उल्लेख केला नाही. प्रत्येकाला नेहमी आदराने वागवायचे. ऑफिसमध्ये कधी कुणीही भेटायला आल्यावर त्या व्यक्तीला ते बाहेर वाट बघत थांबायला लावायचं नाही, हीच त्यांच्या स्वभावाची खासियत होती, असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं.
'प्रत्येक खटल्याचा बारकाईने तपास करणं हा त्यांचा गुणधर्म. ज्या खटल्याचा तपास त्यांच्या कारकिर्दीतील नाही किंवा त्यांनी केला नसेल तरी तो खटला सुरू असेपर्यंत त्यामध्ये व्यक्तिगत लक्ष ते द्यायचे', असंही उज्ज्वल निकम यांनी सांगितलं.'व्यायामाची प्रचंड आवड व खिलाडू वृत्ती असलेला असा हा अधिकारी होता. व्यायामाची आवड असल्यानेच त्यांनी इतके वर्ष कर्करोगासारख्या आजाराचा सामना केला असेल, असंही उज्ज्वल निकम यांनी नमूद केलं.