गुवाहटी : आसाममध्येभाजपाचे नेते हिमंत बिस्वा सरमा यांनी आज (सोमवार) आसामच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. त्यांच्यासोबत १३ कॅबिनेट मंत्र्यांनीही शपथ घेतली. त्यांना राज्यपाल जगदीश मुखी यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनियतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे देखील सहभागी झाले होते.
रविवारी भाजपाच्या विधीमंडळ दलाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्बानंद सोनोवाल यांनी हिमंत बिस्वा सरमा यांच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव बैठकीत तात्काळ मंजूर करण्यात आला. त्यामुळे हिमंत बिस्वा सरमा यांच्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर हिमंत बिस्वा सरमा यांनी रविवारी राजभवन येथे राज्यपाल जगदीश मुखी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर केला. राज्यपालांनी हिमंत बिस्वा सरमा यांचा दावा स्वीकारला व त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिले होते.
दरम्यान, सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबत १३ मंत्र्यांचाही शपथविधी पार पडला. यात भाजपाचे १०, एजीपीच्या दोन आणि यूपीपीएलच्या एका आमदाराचा समावेश आहे. मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब, मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग, नागालँडचे मुख्यमंत्री नीपीयू रिओ उपस्थित होते. तसेच माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल हे देखील उपस्थित होते.
हिमंत बिस्वा सरमा यांच्या मंत्रिमंडळात असाम भाजपाचे प्रमुख रंजीत कुमार दास, असाम गढ़ परिषद (एजीपी) प्रमुख अरमुखतुल बोरा, यूपीपीएल नेता यूजी ब्रह्मा, भाजपा नेते परिमल शुक्लबैद्य, भाजपा नेते चंद्र मोहन यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त केशब महंता, रंगोज पेगू, संजय किशन, जोगेन मोहन अजंता नियोंग, अशोक सिंघल, पीयूष हजारिका, बिमल बोरा यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली.
कोण आहेत हिमंत बिस्वा सरमा?हिमंत बिस्वा सरमा यांची राजकीय कारकिर्द खऱ्या अर्थाने 15 मे 2001 पासून सुरू झाली. त्यांनी गुवाहाटी हायकोर्टात प्रॅक्टिस केली आहे. 1996 ते 2005 पर्यंत त्यांनी वकील म्हणून काम पाहिलं आहे. 1 फेब्रुवारी 1969मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कैलाशनाथ सरमा हे साहित्यिक होते. त्यांची आई आसाम साहित्य संस्थांशी संबंधित आहे. सरमा यांनी कामरुपमध्ये अकादमी स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आहे. तर गुवाहाटीतून महाविद्यालयीन शिक्षण घेतलं आहे. विज्ञान विषयात त्यांनी पदवी आणि नंतर पदव्युत्तर शिक्षण घेतले. राजकारणात असतानाच त्यांनी पीएचडीही केली.
हिमंत बिस्वा सरमा यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता2016 मध्ये हिमंत बिस्वा सरमा यांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात होते. मात्र, 2016च्या निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर भाजपाने सर्बानंद सोनोवाल यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दिली होती. पण, आता परिस्थिती बदलली आहे. बिस्वा सरमा यांनी केवळ आसामच्या पूर्वेकडील भागातच नव्हे तर संपूर्ण आसाममध्ये भाजपाला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी हिमंत बिस्वा सरमा यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली. अशा परिस्थितीत भाजपाकडून आसामचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.