लंडनमधील केंब्रिज विद्यापीठामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणावरून आता वादाला तोंड फुटले आहे. त्यातच आता भाजपाचे फायरब्रँड नेते, आसामचे मुख्यमंत्री आणि राहुल गांधींचे कडवे विरोधत हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींच्या केंब्रिजमधील भाषणावर जोरदार पलटवार केला आहे. हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींच्या प्रत्येक आरोपाला घणाघाती भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे. आधी परकीय एजंट आम्हाला लक्ष्य करायचे, आता आमचेच लोक परदेशात जाऊन आम्हाला लक्ष्य करत आहेत, केंब्रिजमध्ये जाऊन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेवर शिंतोडे उडवण्याचं काम केलं आहे, असा टोला हिमंता बिस्वा सरमा यांनी लगावला आहे. हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट करून लिहिलं की, राहुल गांधी म्हणालेत लोकशाही धोक्यात आहे. त्यामुळे ते आपलं म्हणणं उघडपणे मांडू शकत नाहीत. मात्र वास्तव हे आहे की, त्यांनी ४ हजार किमी यात्रा केली. मात्र यादरम्यान, त्यांच्यासोबत कुठेही कुठल्याही प्रकारची दुर्घटना झालेली नाही. मोदी सरकारने पुरवलेल्या सुरक्षेमुळे हे शक्य झाले. मात्र काँग्रेसच्या सत्ताकाळात भाजपा नेत्यांच्या यात्रेमध्ये काय व्हायचे याची आठवण राहुल गांधींना करून दिली पाहिजे.
यावेळी पेगाससवर बोलणाऱ्या राहुल गांधींवरही हिमंता बिस्वा सरमा यांनी निशाणा साधला. राहुल गांधी म्हणतात की, त्यांच्या फोनमध्ये पेगासस सॉफ्टवेअर होता. याबाबत त्यांना एका अधिकाऱ्याने इशारा दिला होता. मग त्यांनी त्यांचा फोन सुप्रीम कोर्टाने तपासासाठी मागितल्यावर जमा का केला नाही. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने पेगासस असल्याचे कुठलेही पुरावे नसल्याचा निकाल दिला होता.
दरम्यान, राहुल गांधींनी केलेल्या चीनच्या कौतुकावरूनही हिमंता बिस्वा सरमा यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, बीआरआय आज जगातील अनेक देशांमधील कर्जासाठी कारणीभूत आहे. अंकल पित्रोदा यांनी याबाबत सांगितलं नाही? राहुल गांधी यांनी लोकशाहीमध्ये मॅन्युफॅक्चरिंगबाबत प्रश्न उपस्थित केले. मात्र त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी लोकशाहीच सस्पेंड करून ठेवली होती. तेव्हा खरोखरच मॅन्युफॅक्चरिंग वाढली नव्हती. मात्र आज नरेंद्र मोदींनी पीएलआय स्किम सुरू केली आहे. त्यामुळे ती वाढली आहे, असेही सरमा यांनी सांगितले.