आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांच्यावर बोचरी टीका केली आहे. "राहुल गांधी हे राजकारणासाठी योग्य नाहीत, त्यांना गांभीर्यच नाही. राहुल यांना कोणत्याही जबाबदारीशिवाय सत्ता आणि अधिकार हवे आहेत" असं म्हणत शर्मा यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत. मात्र ते पक्षाचे सर्व निर्णय घेतात असंही म्हटलं आहे.
"राहुल गांधी हे एखादी बैठक सुरू असताना मध्येच निघून जातात. खोलीत गेल्यानंतर ते अर्धा-अर्धा तास परत येत नाहीत. बैठक सुरू असताना ते मध्येच व्यायाम करण्यासाठी निघून जातात. त्यांच्यामध्ये विषय़ाचं गांभीर्य नाही. त्यांनी 2019 साली काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीमाना दिला. मात्र अजूनही पक्षाला कोण चालवत आहे? भारत जोडो यात्रेचे नेतृत्व कोण करत आहे. म्हणजेच राहुल गांधी यांना कोणतीही जबाबदारी न स्वीकारता सत्ता आणि अधिकार हवे आहेत."
"पक्ष राहुल गांधी यांच्या पाठीमागे का उभा राहतो?"
"लोकशाहीमध्य जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोणत्याही जबादारीशिवाय सत्ता आणि अधिकार हवे असतील तर ते खूप घातक असते" असं म्हणत हिमंता बिस्वा शर्मा यांनी निशाणा साधला आहे. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत. मात्र ते पक्षाचे सर्व निर्णय घेतात. पराभवाची जबाबदारी घेत काँग्रेसचे अध्यक्षपद सोडलेले असूनही सर्व पक्ष राहुल गांधी यांच्या पाठीमागे का उभा राहतो? गांधी कुटुंबीय गरीब लोकांकडे जात आहेत. मात्र गरीब लोक कधीतरी गांधी कुटुंबाकडे गेलेले पाहिले आहे का? गांधी कुटुंबीय जेथे जेवतात तेथेच एखादी गरीब व्यक्ती जेवल्याचे तुम्ही पाहिलेले आहे का? असे सवालही शर्मा यांनी केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एन्ट्री
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. अशातच आज या निवडणुकीमध्ये एक नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. अगदी कालपर्यंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह उमेदवारीचा अर्ज दाखल करणार हे निश्चित होतं. पण आज सकाळी दिग्विजय सिंह यांनीही निवडणुकीतून माघार घेतली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गांधी परिवाराशी एकनिष्ठ असलेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एन्ट्री झाली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"