लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अदानी समुहाच्या विरोधात अमेरिकी शॉर्ट सेलर ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने जारी केलेल्या अहवालानंतर शेअर बाजारात मोठी पडझड झाली. अशा अस्थिरतेचा मुकाबला करण्यासाठी आपल्याकडे मजबूत चौकट उपलब्ध आहे. नियमांचे उल्लंघन झाले का? याची तपासणी करण्यात येत आहे, असे बाजार नियामक ‘सेबी’ने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.
अहवालानंतर गुंतवणूकदारांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर २ जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या आहेत. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान सेबीने न्यायालयास सांगितले की, हिंडेनबर्ग अहवालानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा संपूर्ण तपास सेबी करीत आहे. शॉर्ट सेलिंगच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याची तपासणी केली जात आहे, तसेच अहवाल जारी होण्याच्या आधी आणि अहवाल जारी झाल्यानंतर बाजारात काय उलाढाली झाल्या, याचाही तपास केला जात आहे.