Anand Mahindra: अमेरिकेच्या हिंडेनबर्ग रिसर्चकडून करण्यात आलेल्या खळबळजनक आरोपांमुळे अदानी समूहाला प्रचंड मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे गुंतवणूकदारांचेही मोठे नुकसान झाले आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने स्टॉक मॅनिपुलेशन आणि अकाउंटिंग फसवणुकीचा आरोप केला आहे. हिंडेनबर्गने अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांचे बाजार भांडवल १ लाख कोटींनी कमी झाल्याचे सांगितले जात आहे. अवघ्या जगभरात याची चर्चा सुरू आहे. यातच सोशल मीडियावर सक्रीय असलेले महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट केले असून, भारताच्या नादी लागू नका, असा इशारा दिला आहे.
शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांचे शेअर मोठ्या प्रमाणावर पडले. हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यापासून अदानी ग्रुपवरून जागतिक माध्यमांमध्ये अनेक अंगांनी चर्चा केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अदानी समूहाच्या मदतीला महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे अप्रत्यक्षरित्या धावून आले आहेत. आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत जागतिक स्तरावरील माध्यमांना चांगलेच सुनावले आहे.
एवढेच सांगतो की कधीच भारताच्या नादी लागू नका
उद्योग क्षेत्रातील सध्याची आव्हाने जागतिक आर्थिक महाशक्ती बनण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेला खीळ घालतील की नाही, यावर जागतिक मीडिया अंदाज लावत आहे. भूकंप, दुष्काळ, मंदी, युद्धे, दहशतवादी हल्ल्यांना भारत तोंड देत असताना मी दीर्घकाळ पाहत आलो आहे. मी एवढेच सांगेन, भारताच्या नादी कधीही लागू नका, असे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले आहे.
दरम्यान, अदानी समुहाच्या प्रमुख अदानी एंटरप्रायझेससह १० कंपन्यांमध्ये मिळून ११० अब्ज डॉलरपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. क्रेडिट सुईस आणि सिटी ग्रुपने अदानींच्या बाँडवर कर्ज देण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे, वित्त सचिव टीव्ही सोमनाथन यांनी अदानी समूहाच्या शेअर्समधील घसरणीला मॅक्रो इकॉनॉमिक दृष्टिकोनातून चहाच्या पेल्यातील वादळ असल्याचे म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"