नवी दिल्ली : आज 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो. भारत देशात हिंदी भाषिक लोकांची संख्या सर्वाधिक आहे. देशातील विविध भागांत संपूर्ण सप्टेंबर महिन्यात हिंदी दिवस साजरा केला जातो. मात्र भारतातील कर्नाटक राज्य या सगळ्याला अपवाद आहे, कारण कर्नाटकात हिंदी भाषेवरून अनेक वाद झाले आहेत. या प्रश्नांची उत्तरे अद्याप समोर आली नाहीत मात्र आजही कर्नाटकात हिंदी दिवस (Hindi Diwas) साजरा केला जात नाही. यामागे कर्नाटकातील राजकारणी लोकांचा मोठा हस्तक्षेप असून राज्यातील काही राजकारणी हिंदी भाषेला मानत नाहीत.
हिंदी दिवस साजरा न करण्याचे आवाहनभारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये हिंदीला वारंवार विरोध केला जातो. यंदा या आंदोलनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांनी हिंदी दिवसापूर्वीच या दिवसाच्या निषेधार्थ मोठे विधान केले होते. त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पत्र लिहून राज्य सरकारला 'हिंदी दिवस' साजरा करू नये असे आवाहन केले आहे.
... म्हणून साजरा केला जात नाही हिंदी दिवसकुमारस्वामी यांचे म्हणणे आहे की, हिंदी दिवस साजरे करणे ही कर्नाटकातील जनतेवर बळजबरी आहे. कारण कर्नाटकात प्रामुख्याने कन्नड ही भाषा बोलली जाते. त्यामुळे हिंदी दिवस साजरा करणे हा त्यांच्यावर अन्याय आहे. कर्नाटक सरकारने कोणत्याही कारणाशिवाय राज्यातील करदात्यांच्या पैशाचा वापर करून हिंदी दिवस साजरा करू नये, असे आवाहन देखील त्यांनी आपल्या पत्राद्वारे सरकारला केले आहे.
एच डी कुमारस्वामी यांनी केलेल्या आवाहनाला कर्नाटकात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. आज कर्नाटकात ठिकठिकाणी हिंदी दिवसाविरोधात निदर्शने सुरू आहेत. विधानसभेत गांधी पुतळ्याजवळ जेडीएस नेत्यांनी निदर्शने केली. जेडीएस नेते 'कन्नडवे सत्य कन्नडवे नित्य' हे गीत गाऊन हिंदी दिवस साजरे करण्यास विरोध करत आहेत. एवढेच नाही तर ठिकठिकाणी कन्नड शाल परिधान करून आणि कन्नड नावाच्या पाट्या लावून निषेध करण्यात येत आहे.