Uri The Surgical Strike Screening In Manipur: गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचाराच्या घटनांमुळे चर्चेत असलेले मणिपूरची, वेगळ्याच कारणामुळे चर्चा होत आहे. मणिपूरमध्ये तब्बल 23 वर्षांनंतर हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, आदिवासी संघटना हमर स्टुडंट्स असोसिएशनने चुरचंदपूर येथील तात्पुरत्या ओपन-एअर थिएटरमध्ये 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या बॉलिवूड चित्रपटाचे स्क्रीनिंग आयोजित केले होते.
2000 साली रिव्होल्युशनरी पीपल्स फ्रंटने मणिपूरमध्ये हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. शाहरुख खान आणि काजोलचा 'कुछ कुछ होता है' 1998 मध्ये राज्यात शेवटचा प्रदर्शित झालेला आहे. पण, आता 2023 च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपट मणिपूरमधील लोकांना दाखवण्यात आला.
दोन दशकांनंतर मणिपूरमध्ये हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. याद्वारे 2000 मध्ये रिव्होल्युशनरी पीपल्स फ्रंटने लादलेल्या बंदीला आव्हान देण्यात आले आहे. RPF ही मेईतेई दहशतवादी संघटनेची राजकीय शाखा आहे.
'मेईतेई गटांच्या देशविरोधी धोरणांना आव्हान...'इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमच्या प्रवक्त्याने सांगितले की, मणिपूरमध्ये दोन दशकांहून अधिक काळ एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. कारण मेईतेई लोकांनी हिंदी चित्रपटांवर बंदी घातली होती. हिंदी चित्रपट दाखविण्याचा उद्देश मेईतेई गटांच्या देशविरोधी धोरणांना आव्हान देणे आणि त्यांचे भारतावरील प्रेम दाखवणे हा आहे.