चेन्नई : तामिळनाडू हिंदी भाषेवरुन पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे. येथील शाळांमध्ये तीन भाषा प्रणालीवरील केंद्र सरकारच्या प्रस्तावावर डीएमके आणि मक्कल नीधि मय्यमने विरोध दर्शविला आहे.
डीएमकेचे राज्यसभा खासदार तुरुचि सिवा आणि मक्कल नीधि मय्यम पार्टीचे प्रमुख कमल हासन यांनी केंद्र सरकारच्या या प्रस्तावाला जाहीर विरोध केला आहे. तुरुचि सिवा यांनी तामिळनाडूतील शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य केल्यास केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
तुरुचि सिवा यांनी सांगितले की, 'तामिळनाडूवर हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न केला, तर येथील जनता हे सहन करणार नाही. आम्ही येथील जनतेवर हिंदी भाषा जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केला, तर त्याला विरोध करण्यास तयार आहोत.'
दुसरीकडे, कमल हासन यांनीही हिंदी भाषेला विरोध केला आहे. ते म्हणाले, ' मी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामुळे मला असे वाटते की, हिंदी भाषा कोणावरही लादली जाऊ नये.'
यावरुन असे समजते की, तामिळनाडूत हिंदी भाषेचा द्वेष अद्यापही कमी झाला नसल्याचे दिसून येते. याआधीही तामिळनाडू हिंदी भाषेविरोधात आंदोलने झाली आहेत. दरम्यान, देशात तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीची नाही आहे.