भारतामध्ये कोणत्याही शहरामध्ये चांगल्या दर्जाचे हॉटेल्स शोधण्यासाठी OYO कंपनी लोकप्रिय मानली जाते. सध्या OYO हॉटेल्स लहान शहरांपासून ते मेट्रोपोलियन शहरांमध्ये पाहायला मिळतात. परंतु, आता OYO कंपनीने आपल्या काही नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. त्यानुसार, यापुढे अविवाहित जोडप्यांना OYO हॉटेल्समध्ये एन्ट्री दिली जाणार नाही. सध्या हा नियम उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरात लागू करण्यात आला आहे. अशातच आता कर्नाटकातील हॉटेल्समध्ये अविवाहित जोडप्यांना प्रवेश बंदी घालण्याची मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्ते तेजस गौडा यांनी केली आहे.
कर्नाटकमध्ये होम-स्टे, लॉज, रेस्टॉरंट्स, सर्व्हिस अपार्टमेंट आणि हॉटेल्समध्ये अविवाहित जोडप्यांच्या प्रवेशावर राज्यव्यापी बंदी घालण्याची विनंती करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. याचबरोबर, डीजीपींना लिहिलेल्या पत्रात तेजस गौडा यांनी असा दावा केला आहे की, या आस्थापनांमध्ये अविवाहित जोडप्यांना अनिर्बंध प्रवेश दिला जातो, ज्यामुळे अनैतिक कृत्यांना प्रोत्साहन मिळत आहे आणि या ठिकाणांची प्रतिष्ठा खराब होत आहे.
दरम्यान, तेजस गौडा यांनी दाखल केलेल्या याचिकेत ट्रिप, लाँग ड्राइव्ह, वाढदिवसाच्या पार्ट्या आणि बॅचलर पार्ट्यांच्या नावाखाली विशेषतः आठवड्याच्या शेवटी असभ्य वर्तन आणि अनैतिक प्रथांच्या तक्रारी अधोरेखित करण्यात आल्या आहेत. तसेच, अशा उपक्रमांमुळे या ठिकाणी भेट देणाऱ्या कुटुंबांना त्रास होत आहे आणि सामाजिक मूल्यांना हानी पोहोचत आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याकडून करण्यात आला आहे.
याचबरोबर, OYO सारख्या कंपन्यांनी अलिकडेच अविवाहित जोडप्यांना रूम बुकिंग नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा निर्णय म्हणजे अशा प्रकारच्या उपक्रमांना आळा घालण्यासाठी एक सकारात्मक पाऊल असल्याचे तेजस गौडा यांनी याचिकेत नमूद केले आहे. तसेच, सामाजिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आणि नैतिक दर्जांमध्ये आणखी घसरण रोखण्यासाठी कर्नाटकातील या आस्थापनांमध्ये अविवाहित जोडप्यांना जाण्यास बंदी घालण्याचे निर्देश जारी करण्याचे आवाहन तेजस गौडा यांनी सरकारला केले आहेत. याशिवाय, यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत या समस्येचे निराकरण करण्यासाठी सरकारी आदेश जारी करण्याचीही मागणी केली आहे.
काय आहे OYO चा नवीन नियम ?दरम्यान, अलीकडेच प्रवास आणि हॉटेल बुकिंग प्लॅटफॉर्म OYO कंपनीने आपल्या भागीदार हॉटेल्ससाठी एक नवीन नियम जारी केला आहे. त्यानुसार, आता अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये चेक-इन करण्याची परवानगी दिली जाणार नाही. म्हणजेच हॉटेलमध्ये फक्त पती-पत्नीच रुम बुक करु शकतील. सध्या हा नियम उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरात लागू करण्यात आला आहे.