गया : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. सर्वप्रकारचे व्यवहार ठप्प आहेत. पण म्हणतात ना 'प्रेम करणाऱ्यांना जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही.' खरे प्रेम असेल, तर प्रेमी जवळ येण्याचा मार्ग शोधून काढतातच. मग परिस्थिती आणि बंधनं कशीही असोत. असाच काहीसा प्रकार घडलाये बिहारमधील गया येथे.
येथे, धर्म आणि रुढी-परंपरांना मागे टाकत एका हिंदू मुलाने मुस्लीम मुलीशी थाटात लग्न केले. अनंत कुमार आणि नसरीन परवीन, असे या तरुण-तरुणीचे नाव आहे. हे दोघेही बहुआर चौरा मोहल्ल्यातील असल्याचे समजते. लॉकडाऊनमुळे मंदिरे बंद असल्याने, येथील विष्णूपद मंदिराच्या परिसरातच त्यांना लग्न उरकावे लागले. खूप प्रयत्न करून येथे भटजींना बोलावण्यात आले होते.
नसरीन आणि अनंत यांचे गेल्या 3 वर्षांपासून एकमेकांवर प्रेम आहे. लॉकडाऊनमुळे त्यांना भेटण्यात अडथळा येत होता. नसरीनच्या कुटुंबीयांना या प्रेम प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नसरीनला मारहाणही केली. तिला एका खोलीत कोडूनही ठेवण्यात आले होते. मात्र, येथून पळ काढत ती अनंतला भेटली आणि त्यांनी अगदी फिल्मी स्टाईलने लग्न केले.
यासंदर्भात अनंतने सांगितले, की त्याचे कुटुंबीय या लग्नासाठी तयार होते. मात्र मुलीच्या नातलगांचा या लग्नाला विरोध होता. यामुळे त्यांनी तिला प्रचंड मारहाणही केली होती. मात्र, आता आम्ही विवाह केला आहे.