नवी दिल्ली - शालेय जीवनात 'सर्वधर्मसमभाव' ही शिकवण दिली जाते. मात्र दिल्लीच्या वझिराबादमध्ये महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या एका शाळेत हिंदू आणि मुस्लिम विद्यार्थ्यांची धर्माच्या आधारावर वेगवेगळया वर्गात विभागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रभान सहरावत यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच दंडासाठी त्यांच्या पगारातून काही रक्कम कापण्याचे आदेश एमसीडीच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
उत्तर दिल्ली महापालिकेतंर्गत काम करणाऱ्या शिक्षकांच्या एका गटाने वझिराबाद येथील प्राथमिक शाळेत हिंदू आणि मुस्लिम विद्यार्थ्यांची धर्माच्या आधारावर वेगवेगळया वर्गात विभागणी केली होती. शाळेच्या आधीच्या मुख्याध्यापकांची बदली झाल्यानंतर चंद्रभान सहरावत यांच्याकडे शाळेची सूत्रे सोपवण्यात आली होती. त्याचवेळी त्यांनी पहिली आणि पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या काही हिंदू आणि मुस्लिम विद्यार्थ्यांना वेगवेगळया वर्गात बसवले. जवळपास तीन महिने हा धक्कादायक प्रकार सुरू होता.
याप्रकरणाची माहिती मिळताच शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना आधीसारखेच पुन्हा एकत्र बसवण्यात आले आहे. धर्माच्या आधारे विद्यार्थ्यांच्या करण्यात आलेल्या विभागणीमध्ये पहिलीच्या 72 विद्यार्थ्यांचा तर पाचवीतील 182 विद्यार्थ्यांचा समावेश होता. दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी हिंदू-मुस्लिम मुलांचे अशाप्रकारे धर्माच्या नावाने विभाजन केल्याच्या कृत्याचा निषेध केला आहे. तसेच देशाच्या संविधानविरूद्ध हे एक षड्यंत्र असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. याप्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सिसोदिया यांनी दिले आहेत.