कोची - हिंदुच्या मंदिरात मुस्लिमांना प्रवेश मिळतो, पण मुस्लीम समुदायाचे प्रार्थनास्थळ असलेल्या मशिदीत हिंदुना प्रवेश दिला जात नाही, असे अनेकदा आपण ऐकले असेल. मात्र, तुमचा हा समज खोटा ठरवणारी आणि जातीभेदीच्या भिंती तोडून टाकणारी घटना केरळमध्ये घडली आहे. येथे अलपुझा जिल्ह्याच्या कायमकुलम येथील मुस्लीम समाजाने हिंदू तरुणीचं लग्न लावून देत एकतेचा संदेश दिला. विशेष म्हणजे प्राचीन महत्त्व असलेल्या मशिदीत हे लग्न लावून देण्यात आलं आहे.
केरळमधील या धार्मिक आणि जातीय सलोख्याचं केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही कौतुक केलंय. केरळमधल्या एकतेचं हे प्रतिक असल्याचं पिनराई यांनी म्हटलंय. आशा आणि शरद असे हिंदू धर्मातील नवविवाहित जोडप्याचं नाव आहे. मुलगी आशाच्या आईने मुस्लीम धर्माच्या नागरिकांकडे या लग्नासाठी मदत मागितली होती. आर्थिक परिस्थिती हालाकिची असल्याने बिंदू यांनी मुस्लीम बांधवांकडे मदत मागितीहोती. त्यानंतर, मशिद समितीने मुलीच्या लग्नासाठी मशिद उपलब्ध करुन दिली.
विशेष म्हणजे, लग्नासाठी 19 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजून 10 मिनिटांचा मुहूर्त काढण्यात आला होता. त्यानुसार, मशिदीच्या वतीने पत्रिका छापून वाटण्यात आल्या. मशिद समितीने मुलीला 10 तोळे सोन्याचे दागिने आणि दोन लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला. हे पूर्ण लग्न हिंदू पद्धतीने पार पडलं. या लग्नासाठी 1 हजार पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मुलीची आई बिंदू यांनी मशिद समितीचे आभार मानले आहेत. सध्या, केरळमध्ये हे लग्न चर्चेचा विषय ठरले आहे.
विवाह झालेल्या तरुणीचं नाव आशा आहे. आशाच्या वडिलांचा दोन वर्षापूर्वी ह्रदयविकाराने मृत्यू झाला होता. आई बिंदू यांच्यासमोर मुलीचं लग्न कसं करायचं याची चिंता लागली होती. पतीच्या निधनानंतर असहाय्य झालेल्या बिंदू आपल्या तीन मुलांसोबत भाड्याच्या घरात राहतात. त्यांनी मशिदीच्या व्यवस्थानकडे यासाठी मदत मागितली. यावर त्यांनी तात्काळ मदतीसाठी तयारी दर्शवली.