अहमदाबाद- गुजरातमधल्या सूरतमध्ये एका 18 वर्षांच्या हिंदू तरुणीनं एका मुस्लिम तरुणाशी लग्न करण्यास तयारी दर्शवली आहे. पण तिनं काही अटीसुद्धा घातल्या आहेत. त्या हिंदू तरुणीनं कतारगाम पोलीस स्टेशनमध्ये प्रतिज्ञापत्र सोपवलं आहे. प्रतिज्ञापत्रात ती लिहिते, मी मुस्लिम तरुणाशी लग्न करण्यास तयार आहे, पण त्याला हिंदू धर्म स्वीकारावा लागेल, तसेच त्याला मांसाहार करणं सोडावं लागेल. तरुणानं मला मांसाहार करण्यास भाग पाडू नये, हेसुद्धा त्या तरुणीला सुनिश्चित करायचं आहे. 24 एप्रिलला पोलिसांना सोपवण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात ती म्हणते, तो मुलगा जेव्हा हिंदू धर्म स्वीकारेल, तेव्हाच मी लग्न करेन, तसेच त्या तरुणानं पुन्हा कधीही मुस्लिम धर्म स्वीकारू नये आणि आपल्या परिवाराच्या मदतीनं धर्म परिवर्तन करावं. खरं तर त्या तरुणीला मुस्लिम तरुणाशी प्रेम आहे. दोघेही प्रेमात सैराट झाले. त्यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी मुलगी बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार दिली.पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आणि मुलीचा शोध सुरू केला. त्यानंतर ती मुलगी सापडली. मुलीला त्या मुस्लिम तरुणाशी लग्न करायचं आहे. तेव्हा तिला तिच्या काकांनी समजावलं की, लग्नानंतर मांसाहार करावा लागेल, तसेच मच्छी आणि मटण बनवावं लागेल. त्यानंतर तरुणीनं प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. तिने 11 मार्च रोजीच लग्नासाठी नोंदणी केली आहे, परंतु जर त्या मुस्लिम मुलानं अटी न मानल्यास त्याच्याशी लग्न करणार नसल्याचंही तिनं स्पष्ट केलं आहे.
मुस्लिम तरुणाशी लग्न करण्यास ही हिंदू तरुणी तयार; पण घातल्या 'या' अटी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 11:51 AM