ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. ४ - पाकिस्तानी गझलगायक गुलाम अली यांच्या कार्यक्रमाला हिंदू सेनेने विरोध केला असून कार्यक्रमात गोंधळ घालण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे . 'घऱ वापसी' चित्रपटाच्या म्युझिक लाँचसाठी गुलाम अली भारतात येणार असून दिल्लीत कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
चित्रपट दिग्दर्शक सुहैब यांनी कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. हिंदू सेनेचे प्रमुख विष्षु गुप्ता यांनी फोन करुन कार्यक्रमात व्यत्यय आणण्याची धमकी दिल्याचा आरोप सुहैब यांनी केला आहे. मंगळवारी सिटी हॉटेलमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. सुहैब यांनी पोलिसांकडे त्यांच्यासाठी आणि कुटुंबासाठी सुरक्षेची मागणी केली आहे.
विष्णु गुप्ता यांनी चित्रपट हिंदूविरोधी असल्यामुळे कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली असल्याचं सांगितलं आहे. याविरोधात निदर्शन करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. पोलिसांनी कार्यक्रमस्थळी चोख सुरक्षाव्यवस्थता ठेवली आहे. जर कोणी कायदा सुरक्षा व्यवस्थेत बाधा आणली तर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
याअगोदरही जानेवारी महिन्यात शिवसेनेने विरोध केल्याने मुंबईतील गुलाम अली यांचा 'घर वापसी' म्युझिक लाँचचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. यानंतर गुलाम अली यांनी त्यांचा मुंबई दौरा रद्द केला होता. 'घर वापसी' चित्रपटात गुलाम अली यांनी संगीत दिलं असून गाणंदेखील गायलं आहे. या चित्रपटात आलोकनाथ, फरिदा जलाल, रिमा लागू, दिपक तिजोरी, झरीना वाहब यांच्या मुख्य भुमिका आहेत.