हिंदू महासभेनं बांधलं नथुराम गोडसेचं मंदिर, आरती करुन वाटला प्रसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 02:48 PM2017-11-16T14:48:38+5:302017-11-16T14:57:26+5:30
हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधीचा मारेकरी नथुराम गोडसेचं मंदिर बांधून प्रतिमेची स्थापना केली आहे. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यालयात नथुराम गोडसेचं मंदिर बांधलं आहे.
भोपाळ - हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधीचा मारेकरी नथुराम गोडसेचं मंदिर बांधून प्रतिमेची स्थापना केली आहे. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यालयात नथुराम गोडसेचं मंदिर बांधलं आहे. यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून काँग्रेसने निषेध व्यक्त केला आहे. यावर हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयवीर भारद्वाज यांनी सांगितलं आहे की, 'नथुराम गोडसेचं मंदिर बांधण्यासाठी आम्ही 9 नोव्हेंबर रोजी जिल्हा प्रशासनाकडे जमीन मागितली होती. प्रशासनाने नकार दिल्यानंतर ग्वाल्हेरमधील आमच्या कार्यालयातच आम्ही मंदिर उभं केलं आहे'.
'आम्हाला या प्रकरणाची माहिती मिळाली आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक याकडे लक्ष देत असून कायदेशीर सल्ला घेतल्यानंतरच योग्य ती कारवाई केली जाईल', अशी माहिती पोलीस महानिरीक्षक मकरंद देऊस्कर यांनी दिली आहे.
#MadhyaPradesh: Observing the death anniversary of Nathuram Godse, Akhil Bharatiya Hindu Sabha built a temple and installed Godse's idol inside their office in Gwalior, yesterday pic.twitter.com/zkEuR0v5cF
— ANI (@ANI) November 16, 2017
विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजय सिंह यांनी निषेध व्यक्त करत हा महात्मा गांधींचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. 'याआधी मुरैना येथे महात्मा गांधींचा फोटो जाळण्यात आला होता आणि आता महासभेने बापूंच्या मारेक-याचं मंदिर ग्वाल्हेरमध्ये उभं करत, आरती करुन प्रसादाचं वाटप केलंय. अशा लोकांविरोधात देशद्रोहाची कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे', असं अजय सिंह बोलले आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी याप्रकरणी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. 'बापूंच्या मारेक-याचं एक मंदिर ग्वाल्हेरमध्ये शिवराज सिंग चौहान यांच्या नाकाखाली टिच्चून तयार करण्यात आलं. दुसरीकडे शिवराज सिंग चौहान गांधीजींच्या नावावर उपवास करण्याचं नाटक करतात. हे अत्यंत लाजिरवणां आणि निंदनीय कृत्य आहे'. दुसरीकडे भाजपा प्रवक्ता बोलले आहेत की, 'महात्मा गांधींवर काँग्रेसने आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न करु नये. जर कोणी कायद्याचं उल्लंघन केलं असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई कऱण्यात येईल'.