पणजी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्त्या करणारा नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करण्यासाठी ग्वाल्हेर येथे मंदिर बांधल्याप्रकरणी हिंदू महासभेचे नेते आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याविरुध्द देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी गोव्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा माजी राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी केली आहे.या मंदिराच्या बांधकामात प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या सर्व नेत्यांविरुध्द गुन्हे नोंदवून पोलिसांनी त्यांना अटक करावी, असे शांताराम म्हणतात. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या भूमिकेचीही चौकशी व्हायला हावी तसेच त्यांच्याविरुध्दही गुन्हा नोंदवावा, असे शांताराम यांनी म्हटले आहे. मंदिर एका रात्रीत बांधलेले नाही. सरकारने वेगवेगळे परवाने वेळोवेळी दिलेले आहेत. मध्यप्रदेशच्या नगर नियोजन खात्याच्या अधिका-यांनीही या बांधकामाला ना हरकत दाखले दिलेले आहेत. ज्यांनी परवाने किंवा ना हरकत दाखले दिलेले आहेत तेदेखिल तेवढेच जबाबदार आहेत. त्यामुळे न्यायदंडाधिका-यांमार्फत वॉरंट बजावून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शांताराम यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे सध्या गुजरातमध्ये महात्मा गांधींच्या भूमीत निवडणूक प्रचार करीत आहेत त्यांना या मंदिर बांधकामाविषयी माहिती आहे का, याचीही चौकशी करावी, असे शांताराम म्हणतात.नवे शैक्षणिक धोरण तयार करताना नथुराम गोडसे याचे कोणत्याही परिस्थितीत उदात्तीकरण होणार नाही याची केंद्र सरकारने खबरदारी घ्यावी, अशी मागणीही शांताराम यांनी केली आहे.