लखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेनंतर लखनऊ शहरात प्रचंड तणाव असून बाजारपेठा व दुकानं बंद करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ येथील कमलेश तिवारी यांच्या कार्यालयात भगवे कपडे परिधान करुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. सुरुवातीला हल्लेखोरांनी कमलेश यांच्यासोबत चर्चा केली. त्यांच्यासोबत चहा देखील घेतला. त्यानंतर त्यांनी कमलेश यांच्यावर गोळीबार केला. तसेच, मिठाईच्या डब्यातून आणलेल्या चाकूने त्यांच्यावर वार करून पळ काढला. या हल्ल्यात जखमी झालेल्या कमलेश यांना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून हल्लेखोरांचा तपास सुरु आहे. तसेच, ज्या ठिकाणी हल्ला करण्यात आला, त्याठिकाणाहून पोलिसांनी काही शस्त्रे आणि काडतूस जप्त केले आहे. या घटनेनंतर लखनऊ शहरात प्रचंड तणाव असून बाजारपेठा व दुकानं बंद करण्यात आली आहेत.
डिसेंबर 2015 मध्ये मोहम्मद पैगंबरांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे कमलेश तिवारी वादात अडकले होते. याशिवाय, गेल्या काही दिवसांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्याचे आदेश दिले होते.