Taj Mahal: जगातील आश्चर्यांपैकी एक असलेली वास्तू म्हणजे ताजमहाल.ताजमहाल पाहण्यासाठी देश-विदेशातून लाखो पर्यटक येत असतात. मात्र, ताजमहालमधील ऊरुस आयोजनावरून हिंदू महासभेने आगरा येथील एका न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती मिळत आहे. ही याचिका दाखल करून घेण्यात आली असून, ०४ मार्च रोजी यावर सुनावणी घेण्यात येणार आहे.
अखिल भारतीय हिंदू महासभा या संघटनेकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत ताजमहालमधील ऊरुस आयोजनावर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच ऊरुसच्या निमित्ताने ताजमहालमध्ये मोफत प्रवेश करण्यासंदर्भात हिंदू महासभेने या याचिकेतून आक्षेप घेतला आहे. मुघल सम्राट शाहजहान स्मरणार्थ तीन दिवसांचे ऊरुस आयोजन करण्यात येते. ०६ फेब्रुवारी ते ०८ फेब्रुवारी या काळात हे आयोजन करण्यात येते.
याचिकाकर्त्याचे वकील अनिल कुमार तिवारी म्हणाले, याचिकाकर्त्या संघटनेचे विभागीय प्रमुख मीना दिवाकर आणि जिल्हाध्यक्ष सौरभ शर्मा यांच्यामार्फत शुक्रवारी दिवाणी न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश यांच्या न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. ऊरुस आयोजन करणाऱ्या समितीला कायमस्वरूपी मनाई हुकूम द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. ऊरुससाठी ताजमहालमध्ये मोफत प्रवेश देण्यावरही याचिकाकर्त्याने आक्षेप घेतला आहे.
संस्थेचे प्रवक्ते संजय जाट यांनी असा युक्तिवाद केला की, संस्थेने माहितीचा अधिकाराच्या आधारे याचिका दाखल केली आहे ज्यामध्ये असे दिसून आले आहे की, मुघल किंवा इंग्रजांनी ताजमहालच्या आत ऊरुस आयोजित करण्याची परवानगी दिली नव्हती.