नवी दिल्ली - राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या हिंदू महासभेच्या महिला नेत्या पूजा पांडेला अटक करण्यात आली आहे. 30 जानेवारीला महात्मा गांधी यांच्या 71 व्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात असताना हिंदू महासभेच्या पूजा पांडेने गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडल्या. गांधींच्या हत्येची घटना पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न हिंदू महासभेकडून केला गेला. या घटनेविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पूजा पांडेला पती अशोक पांडेसहीत अटक केले आहे.
उत्तर प्रदेशातील अलीगड येथे हा संतापजनक प्रकार घडला आहे. गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडत यावेळेस नथुराम गोडसेच्या छायाचित्रावर पुष्पहार अर्पण करत मिठाईचे वापट करण्यात आले होते. शिवाय, 'महात्मा नथुराम गोडसे अमर रहे'च्या घोषणाही दिल्या गेल्या. इतकेच नाही तर हिंदू महासभेने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी शौर्य दिवस साजरा केला. ''महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणणे अयोग्य आहे. जर मी नथुराम गोडसेच्या आधी जन्मले असते, तर मीच महात्मा गांधी यांची हत्या केली असती.''असे संतापजनक वक्तव्यही पूजा शकून पांडेयने केले होते.
अटकेच्या कारवाईपूर्वी पोलिसांनी पूजा पांडेयसहीत 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
अखिल भारतीय हिंदू महासभेची वेबसाइट हॅकया घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी केरला साइबर वॉरिअर्सच्या टीमनं हिंदू महासभेची वेबसाइट हॅक केली होती. लोकांना महात्मा गांधींकडून अहिंसा आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळाली, असा मजकूर हॅकिंग टीमकडून वेबसाइटवर लिहिण्यात आला होता. दरम्यान, हिंदू महासभेची वेबसाइट हॅक होण्याची ही पहिलीच वेळ नाहीय. केरळमधील पूरपरिस्थितीवर प्रतिक्रिया देताना हिंदू महासभेचे प्रमुख स्वामी चक्रपाणि यांनी म्हटले होते की, 'जी लोक बीफ खात नाहीत, त्यांनाच मदत केली पाहिजे'. त्यांच्या या विधानाचा समाचार घेण्यासाठी हॅकर्सनं हिंदू महासभेची वेबसाइट हॅक केली होती.