'मजहब नही सिखाता, आपस में बैर रहना', या उक्तीनुसारच जम्मू-काश्मीरमधील एका गावानं धार्मिक सलोख्याचं, बंधुभावाचं दर्शन घडवलं आहे. गावातल्या एकमेव मुस्लिम कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला ४५० हिंदू कुटुंबांनी आपला पंच म्हणून निवडलं आहे. चौधरी मोहम्मद हुसैन (५४) असं त्यांचं नाव आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये सध्या पंचायत निवडणुका सुरू आहेत. त्यात, भेलन-खरोठी गावातून हंगा पंचायतीवर एक व्यक्ती पंच म्हणून निवडून पाठवायची होती. भेलन-खरोठी हे हिंदूबहुल गाव. तिथे ४५० हिंदू कुटुंब राहतात, तर चौधरी मोहम्मद हुसैन यांचं एकमेव मुस्लिम कुटुंब आहे. पत्नी, पाच मुलं आणि सुनांसोबत हुसैन या गावात अनेक वर्षांपासून राहतात. सगळ्यांशी त्यांचे अगदी घरगुती संबंध आहेत. त्यामुळे मोहम्मद हुसैन यांना पंच म्हणून निवडण्याचा प्रस्ताव समोर आला, तेव्हा कुणीच त्याला विरोध केला नाही. त्यांची निवड अगदी बिनविरोध झाली. आजच्या काळात हिंदू-मुस्लिम एकतेचं हे आदर्श उदाहरणच म्हणावं लागेल. विशेष म्हणजे, सदैव धुमसणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील गावात हे सुखद दृश्यं पाहायला मिळालंय.
धर्माच्या आधारावर तेढ निर्माण करण्याचा, ध्रुवीकरणाचा प्रयत्न आज केला जातोय. परंतु, एकता, समता आणि बंधुता ही आपल्या देशाची संस्कृती आहे, हे आम्हाला दाखवून द्यायचं होतं. आमच्यात कुणीही फूट पाडू शकत नाही, हे सिद्ध करायचं होतं. म्हणून आम्ही सर्वसहमतीने हुसैन यांना पंच म्हणून निवडलं, असं जुने गावकरी धुनी चंद यांनी आनंदाने सांगितलं. गावातील तरुणही या निर्णयाने खूश आहेत. आपण भेलन-खरोठी गावचे सदस्य असल्याचा त्यांना अभिमान वाटतोय, असंही ते म्हणाले.
गावकऱ्यांनी एकमताने आपली पंच म्हणून निवड केल्यानं हुसैन भावुक झालेत. गावात आमचं एकमेव मुस्लिम कुटुंब राहतं, हे आम्हाला कधीच कुणी जाणवू दिलं नाही. आता तर त्यांनी आम्हाला मोठाच सन्मान दिला आहे. या प्रेमाबद्दल, विश्वासाबद्दल मी कायमच त्यांचा ऋणी असेन आणि गावच्या भल्यासाठी काम करेन, अशा भावना हुसैन यांनी व्यक्त केल्या.