अयोध्या (उ.प्र.): बाबरी मशीद-राम जन्मभूमी वादावर चर्चेतून तोडगा काढण्याकरिता हिंदू आणि मुस्लिम समुदायाच्या नेत्यांनी येथे चर्चा केली. हा वाद मिटविण्याकरिता शांततापूर्ण मार्ग अवलंबण्याची गरज दोन्ही पक्षांनी व्यक्त केली आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी बाबरी मशीद प्रकरणातील वयोवृद्ध याचिकाकर्ते हाशीम अन्सारी यांंची सोमवारी भेट घेतली. जवळपास अर्धा तास चाललेल्या या बैठकीदरम्यान अन्य काही महंत आणि साधूही उपस्थित होते. बैठकीनंतर गिरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या वादावर चर्चेद्वारे सर्वसहमतीने तोडगा काढण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. समझोता शांतीपूर्ण आणि दोन्ही समुदायांना स्वीकारार्ह असला पाहिजे. यासोबतच सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची दररोज सुनावणी व्हावी अशीही आमची इच्छा आहे. अन्सारी म्हणाले की, आम्ही चर्चेसाठी नेहमीच तयार असून या वादावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढणे आवश्यक आहे. जेणेकरून दोन्ही समुदायांना यातून समाधान आणि आनंद मिळू शकेल. (वृत्तसंस्था)
अयोध्या तोडग्यासाठी हिंदू-मुस्लीम नेते एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2016 3:50 AM