Ghulam Nabi Azad, Hindu Muslim Controversy: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसपासून फारकत घेऊन डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी (डीपीएपी) स्थापना केली. नुकताच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आझाद जम्मू-काश्मीरच्या लोकांना सांगत आहेत की, हिंदू धर्म इस्लामपेक्षा जुना आहे आणि सर्व मुस्लिम आधी हिंदूच होते. याआधी जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या महिला नेता शेहला रशीद यांचे एक वक्तव्य समोर आले होते, ज्यात त्यांनी जम्मू-काश्मीरमधील विकासासाठी मोदी सरकारचे कौतुक केले होते. तशातच आता आझाद यांच्या व्हिडीओने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला गुलाम नबी आझाद यांचा व्हिडिओ जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील आहे. आझाद ९ ऑगस्ट रोजी भाषण देण्यासाठी येथे पोहोचले होते. व्हिडिओमध्ये आझाद म्हणतात, 'इस्लामचा जन्म 1500 वर्षांपूर्वी झाला होता. भारतात कोणीही बाहेरचा नाही. आपण सर्व या देशाचे आहोत. भारतातील मुस्लिम हे मूळचे हिंदू होते, त्यांचे नंतर धर्मांतर केले. 600 वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये फक्त काश्मिरी पंडित होते. त्यानंतर अनेक लोक धर्मांतर करून मुस्लिम झाले."
यावेळी आझाद यांनी लोकांना बंधुभाव, शांतता आणि एकता राखण्याचे आवाहन केले. "धर्माची राजकारणात सळमिसळ करू नका. धर्माच्या नावावर मतदान करू नका. राजकारणात जो धर्माचा आधार घेतो तो कमकुवत असतो. ज्याची स्वतःवर श्रद्धा आहे, तो धर्माचा आधार घेणार नाही. मी पुढे काय करणार, विकास कसा आणणार हे योग्य व्यक्ती सांगेल. पण जो दुर्बल आहे तो स्वत:च्या धर्माचा आधार घेत मतं मागेल", असे गुलाम नबी आझाद म्हणाले.
आम्ही बाहेरचे नाही, इथलेच आहोत...
"आम्ही बाहेरून आलो नाही. आम्ही इथले भूमिपुत्र आहोत. काही बाहेरून आले आहेत, तर काही मूळ इथलेच आहेत, असे भाजपचे काही नेते म्हणाले. मी त्यांना सांगितले की कोणीही इथले किंवा बाहेरून आलेले नाही. आम्ही सारे इथलेच आहोत," असेही आझाद यांनी ठणकावले.