नवी दिल्ली - लडाख सीमारेषेवर चीनी सैन्यांसोबत भारतीय जवानांची चकमक झाल्यानंतर देशभरातून चीनविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याच्या 20 जवानांना वीरमरण प्राप्त झाले आहे. त्यामुळे देशातील नागरिक आणि विविध संघटनांकडून चीनचा निषेध नोंदविण्यात येत आहे. देशातील अनेक ठिकाणी चीन सामानाची होळी करण्यात आली असून चीनी मालावर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. आता, हिंदू सेनेने नवी दिल्लीतील चीनी दुतावास कार्यालयाबाहेर आपत्तीजनक पोस्टर चिकटवून चीनच्या कृत्याचा निषेध नोंदवला.
गलवान खोऱ्याजवळ 15 जूनच्या रात्री भारतीय जवान आणि चीनी सैनिकांत चकमक झाली. यात भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले. तर चीनचेही मोठे नुकसान झाले असून 35 जवान मारले गेल्याचा दावा अमेरिकन गुप्तचर संस्थेने केला आहे. या घटनेनंतर देशात संतापाचे वातावरण आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधींसह देशातील अनेक विरोधीपक्ष नेत्यांनी यासंदर्भात सरकारकडे चीनला चोख उत्तर देण्याची मागणी केली आहे. तर, भारत-चीन संघर्षाकडे आशियाई देशांसह अमेरिका, ऑस्ट्रेलिया व युरोपीय महासंघाचं लक्ष लागलं आहे. मात्र पाकिस्तान व नेपाळ वगळता एकाही देशानं अद्याप चीनची तळी उचलून धरलेली नाही. किंबहुना चीनच्या दबावापुढे न झुकल्यानं भारताचा दबदबा वाढला आहे.
दुसरीकडे देशातील नागरिकांकडून चीनविरुद्ध रोष व्यक्त करण्यात येत आहे. हिंदू सेनेने चीनी दुतावासाबाहेर गद्दार नावाचे पोस्टर चिकटवून चीनचा निषेध केला. तसेच, हिंदी चिनी- बाय-बाय अशीही पोस्टरबाजी करण्यात आली आहे. गलवान खोऱ्यातील हल्ल्यानंतर चीनविरुद्ध प्रचंड रोष असून चीनी दुतावासाबाहेर निषेध व्यक्त होत आहे. त्यामुळे, दिल्लीतील दुतावास कार्यालयाबाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २ जून रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधला होता. तेव्हा चीनच्या सीमेवरील कुरापतींविषयी चर्चा केली होती. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी उघडपणे चीनची बाजू घेणं स्वाभाविकच म्हणायला हवं. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमधून मिळणाऱ्या निधीची गरज असल्यानंच पाकिस्ताननं चीनधार्जिणी भूमिका घेतली. पाकिस्तान व नेपाळ या दोन्ही देशांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे चीनची तळी उचलून धरली आहे.