नवी दिल्ली : आपल्या दिवंगत वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी दोन हिंदू बहिणींनी ईदच्या सणापूर्वी ईदगाहच्या विस्तारासाठी दीड कोटी रुपयांहून अधिक किंमतीची आपली जमीन दिली. या भगिनींचे दान मुस्लिमांच्या हृदयाला भिडले असून त्यांनी मंगळवारी दिवंगत आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थनाही केली. या दोन्ही बहिणींनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
देशाच्या विविध भागांतून जातीय तणावाच्या बातम्या येत असताना, उत्तराखंडमधील उधमसिंह नगर जिल्ह्यातील काशीपूर या छोट्याशा शहरात दोन बहिणींचा हा उदारतेचा चर्चेचा विषय ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वीस वर्षांपूर्वी मृत्यूपूर्वी ब्रजानंदन प्रसाद रस्तोगी यांनी जवळच्या ईदगाहच्या विस्तारासाठी त्यांची काही शेतजमीन दान करायची असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांना सांगितले होते.
मात्र, आपल्या मुलांना शेवटची इच्छा सांगण्याआधीच ब्रजानंदन प्रसाद रस्तोगी यांचे जानेवारी 2003 मध्ये निधन झाले. दिल्ली आणि मेरठमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत राहणाऱ्या सरोज आणि अनिता या त्यांच्या मुलींना त्यांच्या वडिलांची ही इच्छा नुकतीच कळली. यानंतर त्यांनी ताबडतोब काशीपूरमध्ये राहणारा त्यांचा भाऊ राकेश यांच्याशी संमती मिळवण्यासाठी संपर्क साधला. त्यानंतर राकेश यांनीही यासाठी लगेच होकार दिला.
राकेश रस्तोगी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "वडिलांच्या शेवटच्या इच्छेचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे. माझ्या बहिणींनी वडिलांच्या आत्म्याला शांती मिळेल, असे काहीतरी केले आहे." तर ईदगाह कमिटीचे हसीन खान म्हणाले, "दोन्ही बहिणी जातीय एकतेचे जिवंत उदाहरण आहेत. ईदगाह समिती त्यांच्या या उदारतेबद्दल त्यांचे आभार मानते. दोन्ही बहिणींचा लवकरच सन्मान केला जाईल."
अनिता आणि सरोज यांनी त्यांच्या वडिलांची अखेरची इच्छा पूर्ण करण्याकरिता ईदगाहसाठी जमीन दिल्याने मुस्लिम समाजासोबत सर्वांकडून कौतुक होत आहे. दरम्यान, उत्तराखंडमध्ये ईद साधारणपणे पारंपरिक उत्साहात साजरी केली जाते. मात्र हरिद्वार जिल्ह्यातल्या भगवानपूर भागात काहीसा तणाव होता. हनुमान जयंतीदरम्यान रुरकीजवळच्या डाडा जलालपूर गावात सांप्रदायिक तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे ईदच्या पार्श्वभूमीवर हरिद्वार जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने विशेष बंदोबस्त ठेवला होता.