सध्या सोशल मीडियावर आपल्या प्रेमासाठी पाकिस्तानातूनभारतात आलेल्या सीमानंतर, चर्चा सुरू झाली आहे ती प्रेमासाठीच भारतातूनपाकिस्तानात गेलेल्या अंजूची. राजस्थानातील अलवर जिल्ह्यात असलेल्या भिवडी येथील अंजूने पाकिस्तान गाठून तिचा फेसबुक फ्रेंड नसरुल्लाहसोबत निकाह केला आहे. या दोघांच्या मैत्रीला 2020 मध्ये फेसबुकच्या माध्यमाने सुरुवात झाली होती. सुरुवातीला हे दोघे मेसेंजरवर बोलत असत, त्यानंतर त्यांनी आपले नंबर एकमेकांना दिले आणि व्हॉट्सअॅपवर बोलणे सुरू झाले. अंजू विवाहित आहे. तिला दोन मुलं आहेत. दोन वर्षांपूर्वी अंजूने परदेशात नोकरीच्या निमित्ताने पासपोर्ट देखील तयार केला होता.
महत्वाचे म्हणजे, नसरुल्लाह पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात राहतो. नसरुल्लाह 29 वर्षांचा आहे, तर अंजू 34 वर्षांची आहे. तीन वर्षांपासून दोघांचे बोलणे सुरू होती. काही दिवसांपूर्वी अंजूने पतीसोबत खोटे बोलून नसरुल्लाहला भेटण्यासाठी पाकिस्तान गाठले.
अंजू मीनाचे आजोळ जालौनमधील माधौगड तालुक्यातील कैलोर हे आहे. अंजूच्या कुटुंबीयांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. यामुळे तिचे नातलग तिच्यासोबत संपर्क ठेवत नव्हते. अंजू पूर्वी रिअल इस्टेट कंपनीत काम करत होती. तर आता ती राजस्थानातील भिवाडी येथील एका प्रायव्हेट कंपनीत काम करत होती.
दोन वर्षांपूर्वी परदेशात नोकरीच्या निमित्ताने तयार केला होता पास्पोर्ट -अंजूचा पती अरविंद हादेखील भिवडी येथेच एका खासगी कंपनीत नोकरी करतो. अरविंदने म्हटले आहे, अंजूने दोन वर्षांपूर्वी परदेशात नोकरीच्या निमित्ताने पासपोर्ट मिळाला होता. चार दिवसांपूर्वी ती जयपूरला फिरायला जात असल्याचे सांगून भिवडीहून निघाली होती. यानंतर तिने व्हॉट्सअॅप कॉल करून आपण लाहोरला पोहोचल्याचे सांगितले. 21 जुलै 2023 रोजी ती पाकिस्तानात पोहोचली. अरविंद 2005 पासून भिवडी येथे राहतो. त्याला दोन मुलं आहेत, तो येथे एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतो.
अंजू बनली फातिमा -अजूने नसरुल्लाहसोबत निकाह करण्यासाठी धर्मपरिवर्तन करून मुस्लीम धर्म स्वीकारला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या निकाहनाम्याच्या शपथपत्रात अंजूने आपल्या इच्छेने इस्लाम स्वाकारला असून नसरुल्लाहला कायदेशीर पती मानत असल्याचे म्हटले आहे.
काय आहे प्रतिज्ञापत्रात - सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे, 'नाव- फातिमा, वडील- प्रसाद, पत्ता- अलवर, राजस्थान, भारत. मी प्रतिज्ञापत्रात घोषित करते की, माझे पूर्वीचे नाव अंजू होते आणि मी ख्रिश्चन धर्मीय होते. मी माझ्या स्वखुशीने, कोणत्याही दबावाशिवाय इस्लामचा स्वीकार केला आहे. मला यासाठी कोणतीही जबरदस्ती नव्हती. मी, नसरुल्लाह, वडील गुल मौला खान, पत्ता- दिर, खैबर पख्तुनख्वा, याच्यावर प्रेम करते आणि त्याच्यासाठी माझ्या देशातून पाकिस्तानात आले आहे. मी माझ्या स्वत:च्या इच्छेनुसार नसरुल्लाहसोबत साक्षीदारांसमोर शरियत-ए-मोहम्मदीनुसार मेहर 10 तोळे सोन्यासह निकाह करत आहे. शरियत कायद्यानुसार, नसरुल्लाह माझे पती आहेत. मी नसरुल्लाहसोबत माझ्या इच्छेनुसार लग्न केले आहे. हे माझे विधान सत्य आणि बरोबर आहे. मी यात काहीही लपवले नाही.'
लग्नापूर्वी प्री वेडिंग शूट -अंजू आणि नसरुल्लाहच्या लग्नाच्या बातम्या समोर आल्यानंतर सोशल मीडियावर व्हिडिओ समोर आला आहे. यात अंजू आणि नसरुल्लाह अतिशय रोमँटिक पद्धतीने एकमेकांचा हात धरताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून हे निकाहपूर्वीचे प्री-वेडिंग शूट असल्याच्या चर्चा आहेत.